अमृत अंतर्गत ३५ हजार घरांना दिले नळ कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:42+5:302021-07-28T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता जवळपास ...

अमृत अंतर्गत ३५ हजार घरांना दिले नळ कनेक्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. मनपा पाणी पुरवठा विभागाकडून नवीन नळकनेक्शन देण्याचा कामालादेखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शहरात ३५ हजार घरांना नळकनेक्शन देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुशील साळुंखे यांनी दिली. येत्या तीन महिन्यात शहरातील अन्य भागातदेखील कनेक्शन देण्याचे काम पूर्ण होणार असल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले आहे.
अमृत योजनेनुसार शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळू शकणार आहे. तसेच ज्या भागात मनपा अंतर्गत पाणी पुरवठा होत नव्हता त्या भागातदेखील मनपाकडून आता पाणी पुरवठा केला जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागात मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्षभराआधीच नळ कनेक्शन देण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली होती. जेणेकरून योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना लगेच नवीन योजनेनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
लॉसेस टाळण्यासाठी कमी कनेक्शवर भर
शहरातील अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन देण्याचा मुद्दा काही दिवसांपासून ऐरणीवर आहे. मात्र, नवीन अपार्टमेंटच्या ठिकाणी सम तयार असताना त्या ठिकाणी प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्र कनेक्शन दिल्यास पाण्याचे मोठ्या प्रमाणात लॉसेस होऊ शकतात. त्यामुळे पाण्याची नासाडीदेखील होईल. तसेच जे अपार्टमेंट जुने आहेत तसेच त्या ठिकाणी नवीन टाकी किंवा सम करणे शक्य नसेल अशा ठिकाणच्या रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन देण्याचा विचार मनपाचा सुरू असला तरी ही संख्यादेखील कमी कशी होईल, यावरदेखील मनपाचा विचार सुरू आहे.
नवीन अपार्टमेंटमध्ये दोन कनेक्शन
गेल्या १० ते १५ वर्षात बांधण्यात आलेले अपार्टमेंट हे बहुमजली आहेत. त्यात ८ ते १० पेक्षा जास्त फ्लॅट बांधण्यात आले आहेत. तसेच अपार्टमेंटच्या जागेतच हजारो लीटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी तयार केलेली आहे. त्यामुळे २००८ च्या नियमानुसार भूमिगत टाकीत पाण्याचा साठा करण्याचा नियम लागू होत असून, अशा अपार्टमेंटमध्ये फ्लॅटच्या संख्येनुसार एक इंची व पाऊण इंची नळ कनेक्शन दिले जात आहे. भूमिगत टाकीतून फ्लॅटधारक गरजेनुसार पाण्याची उचल करू शकणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंता सुशील साळुंखे यांनी सांगितले.
सर्वांना मिळणार नळकनेक्शन
शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. अनेक भागात नळकनेक्शन देण्याचे काम सुरू झाले आहे. आता नळ कनेक्शन देताना, ज्यांनी आधी कनेक्शन घेतले नव्हते अशांनादेखील मनपाकडून नळ कनेक्शन दिले जात आहे. जे अनधिकृत नळधारक आहेत त्यांना नळ कनेक्शन दिले तर मनपा प्रशासनाला पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्नदेखील मिळणार आहे. कारण शहरात तब्बल २० हजारहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. तसेच हुडकोसारख्या भागातदेखील नळ कनेक्शन देऊन, पाणी पट्टी आता वसूल करण्यात येणार असल्याचे धोरण मनपाकडून निश्चित केले जात आहे.