तामसवाडी ग्रामस्थांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:03+5:302021-07-14T04:20:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : वरखेडे-लोंढे धरणामुळे विस्थापित होणाऱ्या तामसवाडी गावठाण भागाच्या पुनर्वसनासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ...

Tamaswadi raises hopes of villagers | तामसवाडी ग्रामस्थांच्या आशा पल्लवित

तामसवाडी ग्रामस्थांच्या आशा पल्लवित

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : वरखेडे-लोंढे धरणामुळे विस्थापित होणाऱ्या तामसवाडी गावठाण भागाच्या पुनर्वसनासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनीही अगोदर विस्थापितांचे शंभर टक्के पुनर्वसन आणि नंतर प्रकल्प अशी भूमिका घेतली होती. तामसवाडी पुनर्वसन समितीच्या लढ्यालादेखील निधी मंजूर झाल्याने यश मिळाल्याचा सूर येथे उमटला आहे.

वरखेडे-लोढे प्रकल्पाची पायाभारणी २०१४ मध्ये तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या कार्यकाळात झाली. यानंतर आमदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला निधी मिळवून दिला. केंद्रीय बळीराजा जलसंजीवनी योजनेत या प्रकल्पाचा समावेश झाल्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. यामुळे धरणाचे शंभर टक्के काम पूर्णत्वास गेले आहे.

वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल २६ कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला होता. तामसवाडी पुनर्वसन समितीसोबत जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी बैठकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पुनर्वसनासाठी निधी मंजूर करण्याचा आग्रह धरला होता. निधी मंजूर झाल्याने पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तामसवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरणा नदीवर मध्यम स्वरूपाच्या वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली आहे. यामुळे ३५.३८ दलघमी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे परिसरातील ३१ गावांना लाभ होणार आहे. दरम्यान, तामसवाडी हे गाव प्रकल्पात जाणार नसल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले होते. मात्र प्रकल्प पूर्णत्वाकडे येत असताना तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी सातत्याने होत होती. पुनर्वसनाबाबत आधी अंशतः मान्यता मिळाली असल्याने आता निधी मंजुरीनंतर हा प्रश्न सुटणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

चौकट

नियामक मंडळाच्या मान्यतेची मोहर

२७ जानेवारी २०२० रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी तामसवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला. याच बैठकीत तामसवाडीच्या शंभर टक्के पुनर्वसनासाठी नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली होती. पुनर्वसनासाठी २५ कोटी ८९ लाख रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.

चौकट

शंभर टक्के होणार पुनर्वसन

तामसवाडी या गावाचे १०० टक्के पुनर्वसन होणार असून, यासाठी २५ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे.

१...वरखेडे - लोंढे धरणाच्या पहिल्या प्रशासकीय मान्यतेत तामसवाडी गावचा बुडीत क्षेत्रात समावेश नव्हता.

२...तामसवाडी गावापेक्षा उंचावर असणाऱ्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेत गावाला तीनही बाजूंनी पाण्याचा वेढा पडणार असल्याची बाब समोर आली. यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न प्रकर्षाने ऐरणीवर आला.

३...धरणाचे काम पूर्ण झाले असून, तामसवाडीचे पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी अडवणे शक्य नाही. त्यामुळे तातडीने पूनर्वसनची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Tamaswadi raises hopes of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.