अभिषेक पाटलांसह त्यांच्या समर्थकांवर शिस्तभंगाची कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:22+5:302021-09-13T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना समर्थन देण्यासाठी पक्षाची शिस्त मोडणाऱ्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची ...

अभिषेक पाटलांसह त्यांच्या समर्थकांवर शिस्तभंगाची कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना समर्थन देण्यासाठी पक्षाची शिस्त मोडणाऱ्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी माजी सरचिटणीस सुशील शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जाहीर राजीनामे देऊन पक्षाची बदनामी वजा धमक्या दिल्या तसेच वरिष्ठ नेत्यांचा अपमान सुरूच ठेवल्याचा निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अभिषेक पाटील हे भाजप समर्थक असून त्यांची भाजप समर्थक पदाधिकाऱ्यांच्या व्यवसायात भागीदारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते राष्ट्रवादीच्या सर्वच मीटिंग हे भाजपाच्या नेत्यांना फोनवरून ऐकवित होते. त्याचे आपण साक्षीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महापालिकेतील पोटनिवडणुकीच्या वेळी असो की वाॅटरग्रेसवरील आरोपानंतर त्यांनी सेटलमेंटची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. जळगाव राष्ट्रवादीत नेत्यांच्या मुलांना पदे दिली जात असल्याच्या आरोपाचे खंडण करीत त्यांच्या आई या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये सदस्य आहे. त्यामुळेच त्यांना विधान सभेचे तिकीट व महानगराध्यक्ष पद मिळाले का? असा सवाल त्यांनी केला.
अभिषेक यांच्यासह त्यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याकडे केली आहे.