Sword attack on youth in Bhusawal | भुसावळात तरूणावर तलवार हल्ला

भुसावळात तरूणावर तलवार हल्ला

जळगाव- भुसावळ महामार्गावरील सुहास हॉटेल समोर पूर्वमैमनस्यातून तरूणावर तलवार हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडली़ प्रशांत संजय चौधरी (वय-३०, रा़ भुसावळ) असे जखमी तरूणाचे नाव आहे़ दरम्यान, डाव्या हातावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर जळगाव जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
दुकान गाळ्याच्या कारणावरून प्रशांत चौधरी याच्या वडीलांचे काही तरूणांशी दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता़ नंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले़ मात्र, या प्रकरणात प्रशांत याच्याविरूध्दही बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ अखेर शुक्रवारी दुपारी लहान भाऊ डिगंबर याने त्यास पोलीस ठाण्यात जमा होवून जा असे सांगितले म्हणून तो लहान भावाची दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भुसावळ महामार्गावरील सुहास हॉटेलसमोर वाट बघत होता़ त्याचवेळी अचानक आठ ते दहा तरूणांनी त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली़ तर मिरची पूड व पेट्रोल अंगावर टाकले़

तलवारने हातावर केला वार
लाकडी दांड्यांनी मारहाण केल्यानंतर एकाने प्रशांत चौधरी यांच्या डाव्या हातावर तलवारने वार केला़ त्यात प्रशांतच्या बोटाला गंभीर दुखापत झाली़ काही वेळानंतर मोठ्या भावाला मारहाण झाल्याचे कळताच लहान भाऊ डिगंबर याने घटनास्थळी धाव घेवून भावाला रूग्णालयात नेले़ त्यानंतर जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले़

डॉक्टर नसल्याने घातला गोंधळ
जिल्हा रूग्णालयात प्रशांत याच्या प्राथमिक उपचार केल्यानंतर एक्सरे काढण्यासाठी पाठविण्यात आले़ त्या काळात प्रशांतला रक्ताच्या उलट्या झाल्या़ अन् त्याठिकाणी डॉक्टरचं उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांसह मित्र मंडळींचा संताप अनावर झाला़ त्यांनी गोंधळ घालत डॉक्टर कुठे आहे अशी विचारणा केली़ त्यामुळे काहीवेळ जिल्हा रूग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता़

अतिदक्षता विभागात उपचार सुरू
डाव्या हाताच्या बोटाला तसेच हाता-पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे जखमी प्रशांत चौधरीला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले़ नंतर पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवून घेतले़

 

Web Title: Sword attack on youth in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.