जळगाव/ शिरसोली : तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथे कोमल दीपक बिºहाडे (१९) या तरुणीचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला. कोमल हिच्या गळ्याला व्रण असून गळफास किंवा नेमका काय प्रकार आहे, हे शवविच्छेदनातच स्पष्ट होईल. दुपारी चार वाजता कोमल हिने ओढणीने गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गल्लीतील तरुण व आजोबा उत्तम काशिनाथ निकम यांनी तिला गावातील डॉक्टरकडे नेले, मात्र तेथे डॉक्टर नसल्याने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.कोमलची आई संगीता ही भुसावळ येथे बहिणीच्या मुलाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी गेली होती तर वडील दीपक बिºहाडे बाहेर कामावर गेलेले होेते. लहान भाऊ गावातच होता. वडील पेंटरचे काम करतात.कोमल ही शहरात शिक्षण घेऊन पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये रक्त संकलनाचे काम करायची. तिच्या रोजगारामुळे कुटुंबाला मोठा हातभार लागत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आई संगीता हिने भुसावळ येथून थेट जिल्हा रुग्णालय गाठले.मुलीचा मृतदेह पाहून ती बेशुध्द पडली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली येथे तरुणीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:14 IST