जळगाव : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात पोलिसांना मिळून येत नसलेले तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर हे दोघे पोलिसांना शरण येणार की जाळ्यात अडकणार याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, न्यायालयाने दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून शरण येण्यासाठी १० मार्च अंतिम तारीख देण्यात आली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी शहरात येऊन दोघांच्या घरासह,न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार शहर पोलीस स्टेशन व काव्यरत्नावली चौक आदी ठिकाणी नोटिसा डकविल्या होत्या. या दोघांच्या शोधार्थ पुणे आर्थिक गुन्हे शाखा, डेक्कन पोलीस ठाण्याचे पथके राज्यात तसेच परराज्यात रवाना झाली आहेत.
पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह ग्रामीणमधील दोन अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. सुनील झंवरचा मुलगा सूरज यालाही अटक झालेली आहे. कंडारे व झंवर मात्र दोघही गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. दोघांविरुध्द वारंटही काढण्यात आले होते, तरी देखील ते हजर झाले नाहीत. त्यामुळे या दोघांना फरार घोषित करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू करण्यात आली. पुणे विशेष न्यायालयाचे न्या. एस.एस. गोसावी यांनी १० मार्चपर्यंत न्यायालयात हजर व्हा, अन्यथा फरार घोषित केले जाईल, असा इशारा वजा आदेशच दिला आहे.