जळगाव परिसरात वृध्देची स्वत: ला जाळून घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:00 IST2018-07-31T22:55:58+5:302018-07-31T23:00:31+5:30
अंगावर रॉकेल ओतून स्वत:च जाळून घेत कलाबाई भास्कर पाटील (वय ६०) या वृध्देने आत्महत्या केल्याची घटना देवगाव, ता.जळगाव येथे मंगळवारी घडली.

जळगाव परिसरात वृध्देची स्वत: ला जाळून घेत आत्महत्या
जळगाव : अंगावर रॉकेल ओतून स्वत:च जाळून घेत कलाबाई भास्कर पाटील (वय ६०) या वृध्देने आत्महत्या केल्याची घटना देवगाव, ता.जळगाव येथे मंगळवारी घडली. कलाबाई या अॅड.जितेंद्र पाटील यांच्या आई होत्या. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कलाबाई या देवगाव येथे घरी असताना सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:लाच पेटवून घेतले. त्या घरात जळत असल्याचे शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व गल्लीतील महिलांना दिसले. त्यांनी तत्काळ धाव घेत कलाबाई यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. लोकांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरु असताना दुपारी दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेत त्या ९५ टक्के जळाल्या होत्या.
कलाबाई यांचे पती शिक्षक होते. त्यांचे निधन झाले आहे. मुलगा जितेंद्र वकील तर दुसरा मुलगा विनोद यांचे जळगाव शहरात मेडिकल आहे. मुलगी विवाहित असून सासरी राहते. कलाबाई या कधी मुलांकडे तर कधी गावात रहायच्या. गावात त्यांची शेतीही आहे. मुलांकडून काही दिवसापूर्वीच त्या देवगाव येथे गेल्या होत्या. कोणाताही वाद नाही, आर्थिक अडचण नाही, तरीही त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. सहायक फौजदार कैलास मारुमर्दाने तपास करीत आहेत.