सुभाष चौकात सैनिक आणि पोलिसात दे दणादण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:02 IST2019-11-07T15:02:04+5:302019-11-07T15:02:19+5:30
गुन्हा दाखल नाही : विना क्रमांकाची दुचाकी अडविल्याच्या कारणावरुन पडली वादाची ठिणगी

सुभाष चौकात सैनिक आणि पोलिसात दे दणादण
जळगाव : दुचाकी अडविल्याच्या कारणावरुन शनी पेठ पोलीस स्टेशनचा कर्मचारी आणि सैन्य दलातील जवान यांच्यात बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता सुभाष चौकात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. पोलिसाला मारहाण होत असल्याचे पाहून इतर पोलिसांनी धाव घेऊन या जवानाची चांगलीच धुलाई केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एक सैन्य दलातील जवान बुधवारी दुचाकी घेऊन पासींगसाठी आलेला होता. आरटीओ कार्यालयात त्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो व त्याचा मित्र सायंकाळी सुभाष चौकात आले. परत जाताना सुभाष चौक पोलीस चौकीजवळ एका पोलिसाने विना क्रमांकाची दुचाकी पाहून चालकाला थांबविले. दुचाकी बºहाणपूर येथून घेतल्याचे त्यांच्याकडे कागदपत्रे होती, मात्र क्रमांक नसल्याने दोनशे रुपयाचा दंड लागले या कारणावरुन वाद झाला. तेथे दुचाकीस्वाराने शंभर रुपये घेऊन प्रकरण मिटवून टाका असे सांगितले, मात्र कर्मचारी दंडाच्या रकमेवर ठाम होता, त्यामुळे मागे बसलेल्या सैनिकाने पोलिसाची कॉलर पकडली. त्यात वाद वाढल्याने दोघांनी एकमेकाच्या कानशिलात लगावली. नंतर दोघांमध्ये हाणामारी झाली.
सैनिक असल्याने कारवाई टाळली
हे प्रकरण पाहून इतर पोलीस धावून आले. सैनिकाला जागेवरच चोपून काढत पोलीस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासमोर उभे केले. तेथे हा तरुण सैन्यात असल्याचे स्पष्ट झाले. ससे यांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेत. सिमेवर देशसेवा करीत असल्याची जाणीव ठेवून गुन्हा दाखल केला नाही. समज देवून या सैनिकाला सोडून दिले. हा सैनिक दिवाळीच्या सुटीवर आलेला आहे.