दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार प्रति तास २० मिनिटे अधिक वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:52 IST2019-11-07T14:51:57+5:302019-11-07T14:52:41+5:30
परीक्षा केंद्रांन पत्र : लेखनिक घेण्यासाठी परवानगी आवश्यक

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार प्रति तास २० मिनिटे अधिक वेळ
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १ नोव्हेंबरपासून सुरूवात झाल्या आहे़ परीक्षा काळात दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रतितास २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याबाबतच पत्रक विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांना पाठविण्यात आले आहे़ दर तासाला २० मिनिटे म्हणजेच ३ तासांच्या परीक्षेसाठी ६० मिनिटे अर्थात एक तास अतिरिक्त वेळ देण्याच्या सूचना केल्या आहेत़
दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय प्रसिध्द केला होता़ त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सोयी-सवलतींच्या दृष्टीने नियमावली तयार करणेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठद्वारा एक समिती गठीत करण्यात आली होती़ नंतर समितीने केलेल्या शिफारशी तसेच अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या नियमावलीस मागील वर्षी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून मान्यता प्रदान करण्यात आली होती़
लेखनिक उपलब्ध करून द्या
दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर सोडविण्यासाठी लेखनिक मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते़ त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेसाठी लेखनिक घेतात़ मात्र, लेखनिक घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे़ तसेच महाविद्यालयाने सुध्दा लेखनिकांची यादी तयार करून गरजेनुसार त्यातून विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याचेही विद्यापीठाने कळविले आहे़