जळगाव जिल्ह्यातील धरणसाठा ७९ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:50 PM2019-09-20T12:50:11+5:302019-09-20T12:52:12+5:30

पावसाची सरासरी १०८ टक्क्यांवर : दोन मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा

The storage of dams in Jalgaon district is at 90% | जळगाव जिल्ह्यातील धरणसाठा ७९ टक्क्यांवर

जळगाव जिल्ह्यातील धरणसाठा ७९ टक्क्यांवर

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार व सलग हजेरी लावल्याने जिल्ह्याची पावसाची सरासरी १०८.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील ३ मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प मिळून एकूण जलसाठा ७९.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र तरीही भोकरबारी, मन्याड या मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के तर अग्नावती धरणात १३.३५ टक्केच उपयुक्त साठा झाला आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने तब्बल २३ दिवस उशिराने हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोन-चार दिवसांचाच खंड वगळता पावसाने सातत्यपूर्ण व जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्याने पावसाची शंभरी पार केली असून आतापर्यंत १०८.१ टक्के पाऊस झाला आहे.
१२ तालुक्यात सरासरी शंभरीपार
जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी १०० च्या पुढे गेली आहे. तर उर्वरीत ३ तालुक्यांपैकी चाळीसगाव वगळता अन्य दोन तालुक्यांची सरासरीही ९५ टक्क्यांच्या पुढेच असून परतीच्या पावसात या तालुक्यांमध्येही पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात जळगाव ९६.४ टक्के, तर धरणगाव ९८.५ यांचा समावेश आहे.
सर्वात कमी चाळीसगावात तर सर्वाधिक रावेर तालुक्यात
चाळीसगाव तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ८७.३ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक १२८.९ म्हणजेच १३१.१ टक्के पाऊस रावेर तालुक्यात झाला आहे. जामनेर तालुक्यात १०९.२ टक्के, एरंडोल ११६.९, भुसावळ ११४.०, यावल ११९.०, मुक्ताईनगर १०७.६, बोदवड ११०.९, पाचोरा १०४.७, भडगाव १००.६, अमळनेर १०६.१, पारोळा १०८.७ तर चोपडा तालुक्यात ११०.८ टक्के पाऊस झाला आहे.
धरणांमध्ये एकूण ७९ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ७९.३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हाच साठा जेमतेम ५२.५८ टक्के होता.
मोठ्या प्रकल्पांसोबत मध्यम प्रकल्पही समाधानकारक पाणीसाठा
जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८६.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ६०.३४ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा हतनूरमध्ये ५९.१४ टक्के, गिरणात १०० टक्के तर वाघूर धरणात सुमारे ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. अद्यापही या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने उर्वरीत दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्येही १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे.
दोन मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाही भोकरबारी व मन्याड धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून अग्नावती धरणात १३.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
लष्करी अळी रब्बीत ठरणार घातक
जिल्ह्यात मक्याचे सुमारे ८५ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ही कीड धुवून निघाली आहे. तर अनेक ठिकाणी मका पक्व अवस्थेत गेल्याने लष्करी अळी कोषात गेली आहे. ती नंतर खाली जमीनीवर पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीत कोणतेही पीक घेतल्यास त्यावर या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बीत शेतकऱ्यांनी पीक बदल करावा. तसेच नांगरणी करताना खोलवर नांगरणी करण्याचे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
गिरणातून भोकरबारी भरून घ्या
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात सध्या शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर गिरणा धरण १०० टक्के भरले असून धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत आहे. असे असताना जामदा डाव्या कालव्यातून पाणी सोडून या वाया जाणाºया पाण्यातून भोकरबारी धरण भरण्यात यावे. गरज पडल्यास १०० टक्के भरलेल्या गिरणा धरणातील दोन-चार टक्के पाणीसाठाही कालव्यातून सोडून भोकरबारी धरण १०० टक्के भरण्यात यावे. जेणेकरून ३ वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या पारोळा तालुक्याला दिलासा मिळेल, अशी मागणी नाशिक विभागाचे जलनायक शिवाजी भोईटे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, ‘कडा’चे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
चाळीसगाव तालुक्यात ४ गावांना टँकर सुरूच
एकीकडे जिल्ह्यात पावसाने सरासरीची शंभरी पार केलेली असताना व धरणे ओसंडून वाहत असतानाही चाळीसगाव तालुक्यात मात्र तुलनेत कमी पाऊस झाला आहे. तालुक्याच्या काही भागात पाऊस फारच कमीअसल्याने अद्यापही चार गावांना तीन टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यात बोढरे, करजगाव, चत्रभुजतांडा व शिंदी या गावांचा समावेश आहे.
कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांची स्थिती उत्तम असली तरीही कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण सुरू झाले आहे. मात्र पाऊस सुरू असल्याने कीटकनाशक फवारणी करणेही अशक्य झाल्याने शेतकºयांना जास्तीत जास्त फेरोमन सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. जिल्ह्यात कपाशीचे ५ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र असून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यानुसार गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र सध्यातरी हा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. पाऊस थांबेपर्यंत फेरोमन सापळे लावून या किडीच्या आक्रमणावर नियंत्रण ठेवावे. पाऊस थांबल्यावर कीटकनाशक फवारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वाघूर पाणीसाठा शंभरीकडे
वाघूर धरणात गुरूवारी सकाळी ८६.७२ टक्के पाणीसाठा होता. मात्र दुपारून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढून पाणीसाठा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अद्यापही पावसाचे वातावरण कायम असल्याने परतीच्या पावसात वाघूर धरण १०० टक्के भरण्याची आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे लवकरच सांडव्यावरून पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यापूर्वी २०१४ मध्ये हे धरण १०० टक्के भरले होते.

Web Title: The storage of dams in Jalgaon district is at 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव