जळगावात चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:48 IST2018-10-29T17:46:06+5:302018-10-29T17:48:01+5:30
मध्य रेल्वेच्या जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला रविवारी लेंडी नाल्याजवळ सुरुवात झाली.

जळगावात चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला सुरुवात
जळगाव : मध्य रेल्वेच्याजळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला रविवारी लेंडी नाल्याजवळ सुरुवात झाली. सुरुवातीला पोकलॅण्डच्या सहाय्याने नाल्यातील गाळ काढल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास हा रस्ता बंद करण्यात आला.
भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या व चौथ्या लाईनच्या कामाला रेल्वे प्रशासनाने नुकतीच सुरुवात केली असून, १६० किलोमीटर पर्यंतची ही लाईन असणार आहे. जळगाव यार्डामध्ये लेंडी नाल्याजवळ अप आणि डाऊनच्या रेल्वे लाईनला लागूनच तिसरी व चौथी लाईन टाकण्यात येणार आहे. या कामासाठी लेंडी नाला पुलाखालून ममुराबादकडे जाणारी वाहतूक २८ आॅक्टोबर ते १८ जानेवारीपर्यंत, सुमारे ८३ दिवस लेंडी नाल्यावरील पुलाखालून बंद राहणार आहे.
या ठिकाणी चौथ्या रेल्वेलाईनच्या कामा व्यतिरिक्त लेंडी नाल्याचे खोलीकरणदेखील करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी पोकलॅण्डच्या सहाय्याने नाल्यातील साचलेला गाळ व काडी कचरा काढण्यात आला. दोन्ही बाजूने नाल्याची सफाई करुन, काढण्यात आलेला गाळ व काडी-कचºयाची ट्रॅकटरद्वारे लगेच विल्हेवाट लावण्यात आली.
अन् सायंकाळी रस्ता करण्यात आला बंद
रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला रविवारी दिवसभर नाल्यातील गाळ व नाल्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची दुरुस्ती केली. कामाच्या ठिकाणी दिवसभर रेल्वेच्या आयुध निर्माण विभागाचे वरिष्ठ निर्माण अभियंता एन.पी. पाटील थांबून होते. या कामासाठी भुसावळ येथील बी.एन.अग्रवाल या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. नाल्याची सफाई व इतर कामांचे नियोजन केल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास लोखंडी पत्रे टाकून हा रस्ता बंद करण्यात आला.