सर्वसामान्यासांठी एसटीचा प्रवास सुरक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST2021-02-05T05:51:59+5:302021-02-05T05:51:59+5:30
जळगाव : शहरापासून वाड्यावस्तीपर्यंत जाण्यासाठी आजही लाल परीच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. महामंडळाच्या जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी फक्त ...

सर्वसामान्यासांठी एसटीचा प्रवास सुरक्षितच
जळगाव : शहरापासून वाड्यावस्तीपर्यंत जाण्यासाठी आजही लाल परीच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. महामंडळाच्या जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी फक्त बोटावर मोजण्याइतक्याच चालकांकडून अपघाताचे प्रकार घडल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यासह सुरत, बडोदा, सेल्वासा, उधना, अंकलेश्वर या ठिकाणी सेवा देण्यात येत आहे. `प्रवासी हेच आमचे दैवत ` या म्हणीप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी महामंडळातर्फे चालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी व सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच कार्यशाळेत बसेसची वेळोवेळी तपासणी करुन, दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी २५ ते ३० चालकांकडून अपघात झाला आहे. यामध्ये नेमकी आकडेवारी मात्र आगार प्रशासनातर्फे देण्यात आली नाही.
इन्फो :
चालकांना वेळोवेळी सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. चालकांकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, जळगाव विभाग
जिल्ह्यातील चालक १ हजार ६२६
विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार
१० वर्षापेक्षा जास्त सेवा ३९ चालक
१५ वर्षापेक्षा जास्त सेवा २१ चालक
इन्फो :
७० ला स्पीड लॉक
महामंडळातर्फे चालकांना बसेस स्पीड ठरवून देण्यात आला आहे. जास्तीत जास्त ताशी ७० किलोमीटर वेगाने बस चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे बसचा ७० ला स्पीड लॉक करण्यात आला आहे. मात्र, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून बहुतांश चालक ताशी ५० ते ५५ वेगानेच बस चालवितात. तसेच ज्या मार्गावर रस्ते अत्यंत खराब आहेत, त्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज घेऊन ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने चालविण्याला प्राधान्य दिले जाते.
इन्फो :
प्रवाशांचा एसटीच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासावर विश्वास असल्याने, आजही नागरिक जवळच्या किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आम्ही खबरदारीनेच बसेस चालवितो.
एक चालक, जळगाव आगार
इन्फो:
शहरापेक्षा ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असल्यामुळे, या ठिकाणी बसेस चालविणे मोठे आव्हान असते. अशा वेळी प्रत्येक चालक प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच बस चालवित असतो.
एक चालक, जळगाव आगार
इन्फो :
माईल्ड स्टीलच्या बसेसमुळे अपघात कमी
सध्या महामंडळाच्या ताफ्यात ॲल्युमिनिअम बांधणीतील बसेस असल्या तरी गेल्या वर्षापासून माईल्ड स्टीलच्या बसेसही दाखल झाल्या आहेत. ॲल्युमिनिअम ऐवजी माईल्ड स्टीलने या नव्या बसेसची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. यामुळे अपघात झाल्यास प्रवाशांना इजा कमी होईल, अशा प्रकारची बांधणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा या बसेसमध्ये करण्यात आल्या आहेत.