'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:23 AM2022-06-22T10:23:14+5:302022-06-22T10:23:23+5:30

शिवसेनेतील एकनाथांच्या बंडाच्या योगसाधनेची कमान भाजपने खान्देशी सुपुत्राच्या खांद्यावर टाकली आहे, हे विशेष.

Some MLAs who are with Shiv Sena leader Eknath Shinde are suffering from acidity. | 'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

googlenewsNext

- कुंदन पाटील 

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून राजकीय दगदगीत व्यग्र असणाऱ्या शिवसेनेच्या बहुतांश ‘नाॅट रिचेबल’ आमदारांना ॲसिडिटीने पछाडले आहे. मंगळवारी पहाटे या सर्वच आमदारांनी हाॅटेल प्रशासनाकडे उपचारार्थ औषधी घेत ‘हलकाफुलका’ नाश्ताच आणा म्हणून सांगितले. शिवसेनेतील एकनाथांच्या बंडाच्या योगसाधनेची कमान भाजपने खान्देशी सुपुत्राच्या खांद्यावर टाकली आहे, हे विशेष.

एकनाथ शिंदेंनी भरविलेल्या बंडाच्या यात्रेतील १६ आमदार सोमवारी रात्री दहा वाजता ठाण्याहून सुरतकडे निघाले. तर शिंदे यांनी रात्री दीडनंतर सुरतचा प्रवास सुरू केला. त्यांच्यासमवेतही काही आमदार होते. हा जत्था सुरतच्या ‘ला मेरिडियन’ (जुनी ग्रॅण्ड भगवती) या प्रशस्त हाॅटेलमध्ये टप्प्याटप्प्याने धडकला. 

गुजरात भाजपचे अध्यक्ष व खासदार सी. आर. पाटील यांनी आधीच या बंडकरींच्या दिमतीसाठी विशेष यंत्रणा सज्ज ठेवली होती. खान्देशी पुत्र असलेले सी. आर. पाटील सोमवारी सौराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार पाटील यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या २५ वर आमदारांना  सुरक्षाकवचही पुरविले.

विधान परिषद निवडणुकीमुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत रात्रीचा दिवस करणाऱ्या या आमदारांना सुरतवारीविषयी कल्पनाही नव्हती. अचानक सूचना मिळताच त्यांना सोमवारची रात्रही जागरण करावे लागले. त्यामुळे बहुतांश आमदारांना  ॲसिडिटीने पछाडले. मंगळवारी सकाळी हाॅटेल प्रशासनाकडून नाश्त्याची विचारणा झाली. तेव्हा आधी ‘ॲसिडिटी’चे पाहू या म्हणून ‘हलकाफुलका’ नाश्ता द्या म्हणून सांगितले गेले. या आमदारांनी गुजराती ‘खमणी’चा नाश्त्यात आस्वाद घेतला.

रूम वेगळ्याच नावाने राखीव-

या हाॅटेलमधील राखीव असलेल्या रूम स्थानिक तर काही बाहेरच्या मंडळींच्या नावाने बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणता आमदार कोणत्या रूमवर आहे, याची माहिती एकनाथ शिंदे आणि सी. आर. पाटील यांच्याशिवाय इतर कुणालाही माहिती नाही.

Web Title: Some MLAs who are with Shiv Sena leader Eknath Shinde are suffering from acidity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.