पातोंडा येथे अल्प प्रमाणात लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:42+5:302021-07-14T04:19:42+5:30
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त पात्र दुसऱ्या डोसधारकांनाच सोमवारी कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले. पहिला ...

पातोंडा येथे अल्प प्रमाणात लस उपलब्ध
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त पात्र दुसऱ्या डोसधारकांनाच सोमवारी कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले. पहिला डोस घेणाऱ्यांना नाराजीने आल्या पावली घरी परत जावे लागले.
गाव व परिसराच्या दृष्टीने जादा डोसचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दि. १२ रोजी पहाटे ५ वाजेपासून लसीकरणासाठी अठरा वर्षांवरील सर्वांनीच पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लांबलचक रांगा लावल्या. परंतु ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले असतील, अशांनाच दुसरा डोस मिळणार होता. पहिल्या डोसवाल्यांना डोस मिळणार नाहीत. फक्त शंभरच डोस आले आहेत, असे नागरिकांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बहुसंख्य नागरिकांना निराश होऊन परत जावे लागले.
गाव व परिसरातील लोकसंख्येच्या मानाने फारच अल्प प्रमाणात डोस उपलब्ध होतात. त्यामुळे नंबर लावतेवेळी वादविवाद होऊन भांडणेही होतात. वरिष्ठांनी जादा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जवळच्या पारोळा तालुक्यात सरसकट पात्र १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यालाच का असा वेगळा नियम? असा प्रश्न केला जात आहे.
आमची मागणी जादाच राहते. जिल्हास्तरावरून जसजसा लसीचा पुरवठा होईल, तसे लसीकरण होईल. तालुक्यात दुसरा डोस घेणारे पात्र लाभार्थी जास्त आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरून नियोजन होत असते.
-डाॅ. प्रशांत कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी:-प्रशांत कुलकर्णी
120721\12jal_3_12072021_12.jpg
पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणसाठी लागलेली लांबलचक रांग