‘कौशल्य विकास’मुळे मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:57+5:302021-07-17T04:13:57+5:30
जळगाव : कोविडच्या काळात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत होती. ती कमतरता मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळे नक्कीच ...

‘कौशल्य विकास’मुळे मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होईल
जळगाव : कोविडच्या काळात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत होती. ती कमतरता मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामुळे नक्कीच पूर्ण होईल. हा पायलेट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर हा पॅटर्न संपूर्ण भारतभर राबविता येईल, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावची निवड झाली असून, याअंतर्गत जनरल ड्युटी असिस्टंट हा ३० विद्यार्थी प्रवेशक्षमता असलेला पहिला अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी पंकज व्यवहारे यांचे व्याख्यान औषधशास्त्र विभागाच्या परिवर्तन सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास अधिकारी मिलिंद देशपांडे होते. कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण केंद्राचे जिल्हा समन्वयक महेश चौधरी यांनी माहिती दिली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक दीपक बोरसे, दत्तात्रय रिठे, महाविद्यालयातील डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.