गावठी पिस्तूल व पाच दुचाकीसह चोरटा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:07 IST2019-01-28T13:06:50+5:302019-01-28T13:07:06+5:30
सत्रासेनच्या जंगलात लपविल्या दुचाकी

गावठी पिस्तूल व पाच दुचाकीसह चोरटा अटकेत
जळगाव : चोरीच्या पाच दुचाकी व गावठी पिस्तुलसह राहूल सुरेश कोळी (वय २३, रा.वरवाडा, ता. शिरपुर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी चोपडा येथून अटक केली. त्याने चोरलेल्या चार दुचाकी सत्रासेनच्या जंगलात लपविल्या होत्या, तर एक दुचाकी तो स्वत: वापरत होता.
चोपडा शहरात एका तरुणाकडे चोरीची दुचाकी असून तो अट्टल चोरटा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, युनुस शेख, सूरज पाटील, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, हरीश परदेशी व चालक दीपक पाटील यांचे पथक नेमले होते.
या पथकाने रविवारी चोपडा शहरातील विवेकानंद विद्यालयासमोरुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला गावठी पिस्तुल आढळून आले. त्याच्याजवळ असलेली दुचाकी २०१५ मध्ये चोपडा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातून चोरी झाल्याचे त्याने पथकाला सांगितले. दरम्यान, या दुचाकीबाबत चोरीचा गुन्हाही दाखल आहे.
सूरज पाटील यांच्या फिर्यादीवरुन राहूल कोळी याच्याविरुध्द आर्म अॅक्ट व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याद्दष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे,