सराफ व्यावसायिकावरील हल्ल्याचा तपास अडकला हद्दीच्या वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:26 IST2019-01-11T22:26:11+5:302019-01-11T22:26:34+5:30
सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

सराफ व्यावसायिकावरील हल्ल्याचा तपास अडकला हद्दीच्या वादात
पहूर, ता. जामनेर : वाकोद येथील कमलेश किशोर छाजेड यांच्यासह एका जणांवर झालेल्या प्राणघातक हल्ला सहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलिसांनी शून्य क्रमांकाने दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पहूर व फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादात अडकला आहे. तीन दिवस उलटूनही हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत.
वाकोद येथील सुवर्ण व्यावसायिक कमलेश किशोर छाजेड हे आपल्या एका सहकाऱ्यासह दुचाकीने वाकोद येथे जात असताना बुधवारी रात्री त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी छाजेड यांच्या जबाबावरून पहूर पोलिसात दरोड्याचा शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याचा तपास करण्याची जबाबदारीबाबत घटनास्थळ फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी. जºहाड व पहूर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसाडे यांनी घटनास्थळी जावून शुक्रवारी पाहणी केली . यादरम्यान ही घटना औरंगाबाद ग्रामीण पोलीस हद्दीतील पळसखेडा शिवारात घडल्याचा दावा पहूर पोलिसांनी केला आहे. तर फर्दापूर पोलिसांनी याबाबत शासंकता उपस्थित करून शहानिशा करण्यात येईल असे सांगितले. या हल्ल्यावेळी दहा ग्रॅम सोन्याची चैन, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी एक मोबाईल व चाळीस हजार रोख असा ९५ हजाराचा ऐवज घेऊन पसार झाले आहे. पहूर पोलिसांनी या जबाबावरून अज्ञात सहा जणांना विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सदर घटना फर्दापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने आमच्या कडे दाखल होऊन फर्दापूर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात येईल.
- राजेश रसाडे, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पहूर
घटना आमच्या हद्दीत घडली किंवा नाही याची प्रथम शहानिशा करावी लागेल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- एस. डी.जºहाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक फर्दापूर