"बाळासाहेबांनी दिलेला 'तो' ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात", गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 12:52 PM2022-01-23T12:52:43+5:302022-01-23T12:54:16+5:30

Gulabrao Patil : बाळासाहेबांनी दिलेला तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना आज उजाळा दिला.

Shiv Sena leader Gulabrao Patil Pays Homage To Balasaheb Thackeray On His Jayanti | "बाळासाहेबांनी दिलेला 'तो' ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात", गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

"बाळासाहेबांनी दिलेला 'तो' ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात", गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

Next

- प्रशांत भदाणे

जळगाव :  1999 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीवर माझ्या कपाळाला गुलाल लावून गळ्यात ताईत घातला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. बाळासाहेबांनी दिलेला तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना आज उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने मंत्री पाटील यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभला म्हणून मी आज याठिकाणी पोहचलो आहे. माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांसाठी ते दैवत आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हा दिवस शिवसैनिकांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. विविध उपक्रमांनी आम्ही हा दिवस साजरा करतो.

बाळासाहेब आज आपल्यात नाहीत, हे कधीही आम्हाला वाटत नाही. कारण त्यांचे विचार कायम आहेत. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेली संघटना आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी देखील नेतृत्त्व देतांना सर्वसामान्य लोकांना प्राधान्य दिले. कदाचित बाळासाहेब नसते तर माझ्यासारख्या व्यक्तीला मंत्रिपदापर्यंत पोहोचता आले नसते, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

'ही' आठवण मी मरेपर्यंत विसरणार नाही!
बाळासाहेबांचा मला प्रत्यक्ष सहवास लाभला हे माझं भाग्यच आहे. 1999 मध्ये मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या सभापती होतो. त्यावेळी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली होती. आमच्या मतदारसंघातून माझ्यासह गुलाबराव वाघ, रमेश महाजन यांची नावे चर्चेत होती. शेवटी माझे नाव निश्चित झाल्याने तिकीट मागण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. त्यावेळी जनता दल आणि इतर पक्षांसोबत शिवसेनेची युती होती. त्यामुळे एक प्रस्ताव असा आला की जनता दलाचे महेंद्रसिंग पाटील यांना मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. पण त्यावेळी महेंद्रसिंग पाटील यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे बाळासाहेबांनी माझ्या कपाळाला गुलाल लावून माझ्या गळ्यात उमेदवारीचा ताईत टाकला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडूनही आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. बाळासाहेबांनी माझ्या गळ्यात टाकलेला ताईत मी आजही जपला आहे. तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.

'विरोधकांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही'
बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आज राहिली नाही, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते, या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्हाला विरोधकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या पाठीशी आणि देशात हिंदुत्वासाठी शिवसेना सातत्यानं उभी राहते. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसैनिक सतत लढा देत आले आहेत. आम्ही तुरुंगवासही भोगला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही. सरकार स्थापनेपासून विरोधकांचं फाटलं आहे. त्यांच्याकडे आज कोणताही मुद्दा नसल्याने ते शिवसेनेवर मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करत असतात. त्यांनी सरकार स्थापनेवेळी जर पहल केली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा चिमटाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.

Web Title: Shiv Sena leader Gulabrao Patil Pays Homage To Balasaheb Thackeray On His Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.