"३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:38 PM2022-06-29T19:38:23+5:302022-06-29T19:38:49+5:30

गुलाबराव पाटीलांची राऊत, सावंतावर टीकास्त्र ; आमचे बंड शिवसेना फोडण्यासाठी नाही तर शिवसेना वाचविण्यासाठी - पाटील

shiv sena leader gulabrao patil maharashtra political crisis jalgaon sharad pawar eknath shinde | "३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता"

"३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता"

Next

अजय पाटील

जळगाव - कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनात घेवून, शालेय जीवनापासून शिवसेनेसाठी काम केले आहे. ३५ वर्ष वडापाव खावून मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणं ऐकली, संघटनेचे काम केले. तेव्हा कुठे मंत्रीपद मिळाली. आज जे आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत,असे संजय राऊत जनतेमधून कधिही निवडून आलेले नाहीत. ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची हिंमत यांची होत नाही, ते आम्हाला आज त्यागाची भाषा शिकवत आहेत, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत सेनेचे ३९ आमदार आपल्या बाजूने खेचले आहेत. त्यात शिवसनेचे निष्ठावंत नेते व खान्देशची मुलुखमैदान तोफ समजले जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनीही शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या निष्ठेवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका ‘लोकमत’व्दारे मांडली आहे. या सर्व घडामोडींवर व बंडाच्या कारणांबाबत गुलाबराव पाटील  ‘लोकमत’कडे व्यक्त झाले आहेत.

४० आमदार सोडून गेले, तरी शरद पवारांना सोडायला तयार नाही

शिवसेनेतून एकटा गुलाबराव पाटील फुटला असता तर मान्य केले असते की स्वार्थासाठी पक्ष सोडला. मात्र, या बंडात एकटा गुलाबराव पाटील नसून, शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यापैकी अनेक आमदार गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचे काम करत आहेत. ४० आमदारांवर शिवसेना सोडण्याची वेळ का आली ? याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून होणे गरजेचे असताना, शिवसेनेचे प्रवक्ते या आमदारांवर खालच्या भाषेत टीका करत आहेत. आमची व सर्व आमदारांची मागणी एकच आहे. मविआतून बाहेर निघा, मात्र पक्षप्रमुख ४० आमदारांना सोडू शकतात, वर्षा बंगला सोडला, शिवसेना फुटू द्यायला तयार आहेत. मात्र, शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, हे शिवसेनेचे दुर्देव असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

२ महिन्यांपूर्वीच नाराजीची मुख्यमंत्र्यांना दिली होती कल्पना
शिवसेनेतील मंत्र्यांची कामे होतात. मात्र, शिवसेनेच्या आमदारांची छोटी-छोटी कामे देखील होत नाहीत. यामुळे आमदार नाराज असल्याची माहिती पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. मात्र, पक्ष प्रमुखांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. जर पक्ष प्रमुख राज्यात फिरू शकत नाहीत. तर आदित्य ठाकरे यांना राज्यात फिरून संघटनेचे मेळावे घ्यावेत असा ही सल्ला दिला. मात्र, आदित्य ठाकरेंनी देखील याकडे दुर्लक्ष केले. ८ महिन्यांपुर्वी संजय राऊत यांनाही आमदारांच्या नाराजीबाबत कल्पणा दिली. मात्र, तेव्हाही लक्ष दिले गेले नसल्यानेच आज ही वेळ शिवसेनेवर आली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मला विचारूनच गुलाबराव वाघ सेनेच्या मेळाव्याला गेले
सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नसल्याचे सांगितले.

संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावू
संजय राऊत यांना माहिती नाही, पान टपरीवाल्याला चांगला चूना देखील लावता येतो. संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावण्याचेही काम करू असा इशारा गुलाबराव पाटील यांनी बुधवारी गुवाहाटी मध्ये उपस्थित आमदारांच्या बैठकीत दिला आहे. आमची स्टोरी  राऊतांना सांगितली तर १९९२ च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होतो. त्यावेळी संजय राऊत कुठे होते ते माहिती नाही..? राऊतांना कलम ५६ काय असते, ३०२ काय असते हे माहिती नाही. दंगलीच्या वेळेत पायी चालण काय असते , तडीपार काय असते  हे त्यांना माहिती नाही, आणि आम्हाला त्यागाच्या गोष्टी शिकवता आहेत असा टोला या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी लगावला.

काय म्हणाले गुलाबराव पाटील

१. आमचे बंड शिवसेना वाचविण्यासाठीच आणि आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेतच

२. आमची निष्ठा ‘ठाकरे’ आडनावाशी सदैव कायम राहिल, मातोश्री आमच्यासाठी देव्हाऱ्यासारखेच राहिल.

३. शिवसेनेने आमच्या नक्कीच उपकार केले हे आम्ही मान्य करुच, मात्र आम्ही केलेल्या संघर्षाचे काहीच मोल नाही ..?

४. जिल्ह्यातील १५०० पैकी १ हजार गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा सुरु केल्या, त्याचा विसर आम्हाला गद्दार ठरविले जात आहे.

५. आम्ही शिवसेनेचे काम केले, संघर्ष केला. म्हणूनच तर आम्हाला पदं मिळाली.

६. घरात तुळशीपत्र ठेवून, बाहेर शिवसेनेचे काम केले. अनेकवेळा तुरूंगात गेलो,आमच्यावर अजूनही असंख्य केसेस आहेत

Web Title: shiv sena leader gulabrao patil maharashtra political crisis jalgaon sharad pawar eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.