लाइक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:58+5:302021-09-12T04:20:58+5:30
जळगाव : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाॅट्सॲपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी लोक ओळखी-अनोळखी लोकांशी ...

लाइक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागेल जेलची हवा!
जळगाव : फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाॅट्सॲपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी लोक ओळखी-अनोळखी लोकांशी जोडलेले आहेत. दररोज काही ना काही शेअर करत असतात. मात्र, अनेकदा आपण अशी माहिती शेअर करतो, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हीदेखील या प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर विना विचार करता काहीही शेअर करू नका, अनथा जेलची हवा खावी लागेल. सायबर पोलिसांकडून याबाबत वारंवार जनतेला आवाहन केले जात आहे.
सोशल मीडियावर बदनामीच्या सर्वाधिक घटना चालू वर्षात घडल्या आहेत. बदनामी नको म्हणून काही जणांनी तक्रारी देणे टाळल्याचेही उघड झाले आहे. केवळ तोंडी तक्रारी झालेल्या आहेत. २०१९ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत तब्बल २५ गुन्हे सायबर पोलिसांत दाखल झालेले आहेत. सर्वांत जास्त १० गुन्हे आठ महिन्यांत दाखल झालेले आहेत. या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची बदनामी केल्याचेही प्रकरणे आहेत. फेसबुक, मेसेंजरवर व्हिडिओ प्रसारित करणे, अश्लील मेसेज व अश्लील फोटो पाठविणे, त्याशिवाय अश्लील शिवीगाळ यासारखे प्रकार दिवसागणिक वाढत चालले असून याबाबतच्या पोस्टला लाइक करणे, शेअर करणे, फॉरवर्ड करण्याचे देखील तितकेच प्रमाण आहे, असे प्रकार आता महागात पडू शकतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच करावा, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जाते.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर अश्लील कमेंटस्, फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी व हिंसा पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करू नये. हिंसा पसरण्याच्या उद्देशाने पोस्ट शेअर करणाऱ्या युजर्सला प्लॅटफॉर्मकडून ब्लॉक केले जाते. सोबतच, कंपन्या आयपी एड्रेस पोलिसांना पाठवतात व अशा युजर्सवर कारवाई होऊ शकते.