लंडन : भारताने इंग्लंडविरोधात चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ८ बाद ४४५ धावा करत ३४६ धावांची मोठी आघाडी घेतली होती. उपहारानंतर भारताच्या डावाचे आकर्षण ठरले ते शार्दुल ठाकूर (६०) आणि ऋषभ पंत (५०) यांची अर्धशतके. या दोघांनी शानदार फलंदाजी करत इंग्लंडच्या डावाच्या चिंधड्या उडवल्या. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा जसप्रीत बुमराह १९ आणि उमेश यादव १३ धावा करून खेळत होते.
द ओव्हलवर चौथा दिवशी भारताने तीन बाद २७० वरून पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या सत्रात तीन बळी गमावल्यावर भारताने ५९ धावा जोडल्या. जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यात रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली यांनी अंडरसनला चौकार लगावत लयीत येण्याचा प्रयत्न केला. मात्र जो रुटने व्होक्सकडे चेंडू सोपवताच जडेजा पायचीत झाला. त्यानंतर त्याच षटकात रहाणेला पायचीत केले. मात्र डीआरएसमध्ये निर्णय भारताच्या बाजूने लागला. याचा फायदा रहाणेला घेता आला नाही. रहाणे खातेदेखील उघडू शकला नाही. त्यामुळे अखेरच्या कसोटीत अंतिम ११ मध्ये त्याचे स्थान अनिश्चित मानले जात आहे.
दोघेही बाद झाल्यावर कोहलीने संथ खेळ केला. तो अर्धशतकदेखील करू शकला नाही. मोईन अलीने त्याला बाद केले.
उपहारानंतर मात्र खेळ भारताच्या बाजूने गेला. शार्दुल ठाकूर याने आपल्या ६० धावांच्या खेळीत एक षटकार आणि सात चौकार लगावले. तर गेल्या सात डावात अपयशी ठरलेल्या ऋषभ पंत यालादेखील यावेळी सूर गवसला त्याने १०६ चेंडूत ५० धावांची संयमी खेळी करत भारताची आघाडी वाढवली. मात्र रुटने फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच हे दोघे बाद झाले. अलीने पंतला तर रुटने स्वत: ठाकूरला बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पहिला डावभारत : सर्वबाद १९१ धावा
इंग्लंड : सर्वबाद २९० धावा
दुसरा डाव भारत : रोहित शर्मा १२७, चेतेश्वर पुजारा ६१, विराट कोहली ४४, ऋषभ पंत ५०, शार्दुल ठाकूर ६०, एकूण १४४ षटकांत ८ बाद ४४५ धावा गोलंदाजी अँडरसन १/७९, २/१०५, २/७२, २/११८, १/१६.