शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगावात दोन पदाधिकारी बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 21:23 IST2023-07-03T21:22:55+5:302023-07-03T21:23:47+5:30
कारवाई झालेल्यांमध्ये जळगाव युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील आणि जळगाव शहर युवक कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगावात दोन पदाधिकारी बडतर्फ
जळगाव : पक्षविरोधात भूमिका घेत भाजपा व शिंदे सरकारमध्ये सामील होणाऱ्या आमदारांना दिलेला पाठिंबा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना महागात पडला आहे. त्यांच्यावर पक्षाने सोमवारी, बडतर्फीची कारवाई केली. त्यामुळे काल आनंदोत्सव आणि आज बडतर्फी, अशी त्यांची स्थिती झाली आहे.
कारवाई झालेल्यांमध्ये जळगाव युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील आणि जळगाव शहर युवक कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे आमदार भाजपा-शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यामध्ये अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश आहे. पक्षाच्या हिताविरोधात भूमिका घेणाऱ्या या गटाला पाठिंबा दिल्याने रवींद्र पाटील व सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी बजावले आहे. बडतर्फीच्या कारवाईनुसार, या दोघांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह यांचा वापर करता येणार नाही. अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.