शरद पवार करणार लोकसभा, विधानसभेची चाचपणी; अमळनेरात ग्रंथालय सेलचे अधिवेशन
By सुनील पाटील | Updated: June 14, 2023 16:30 IST2023-06-14T16:29:59+5:302023-06-14T16:30:14+5:30
या अधिवेशनाच्यानिमित्ताने पवार लोकसभा आणि विधानसभेची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवार करणार लोकसभा, विधानसभेची चाचपणी; अमळनेरात ग्रंथालय सेलचे अधिवेशन
जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अमळनेरात १६ जून रोजी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते तर समारोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते होणार आहे. या अधिवेशनाच्यानिमित्ताने पवार लोकसभा आणि विधानसभेची चाचपणी केली जाणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, योगेश देसले, विलास पाटील, अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, ॲड.सचिन पाटील आदी उपस्थित होते. शरद पवार गुरुवारी रात्री ९ वाजता राजधानी एक्सप्रेसने जळगावात येतील. रात्री जैन हिल्स येथे मुक्काम केल्यावर १६ रोजी सकाळी ८ वाजता अमळनेरकडे रवाना होतील. शिंदखेडा तालुक्यातील कार्यक्रमांना ते हजेरी लावतील. त्यांच्यासोबत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असतील. सर्व नेते अमळनेरात मुक्काम करतील. या दरम्यान ते जळगाव व अमळनेरात काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरीही भेट देणार आहेत. अधिवेशनात ९ ग्रंथालयांना शरदचंद्रजी पवार ग्रंथमित्र पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
दोन खुल्या जीपमधून रोड शो
अमळनेरात दोन खुल्या जीपमधून शरद पवार रोड शो करणार आहेत. त्यादृष्टीने तयारी झालेली आहे.पावसाचे वातावरण असले तर हा शो रद्द होऊ शकतो, असे आमदार पाटील यांनी सांगितले. अमळनेरातील ज्या जागेसाठी उपोषण करण्यात आले, त्या जागेची पाहणी अजित पवार करणार आहेत.
जि.प. न.प.चीही तयारी
दोन्ही लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कोणत्या ठिकाणी कोण संभाव्य उमेदवार असू शकतो, आघाडीत कोणाची कुठे ताकद आहे याची चाचपणी करण्यासोबतच सरकारने या निवडणुकांच्या आधी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली तर त्याचीही तयारी असावी, त्यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे. लोकसभेसोबतच विधानभेची निवडणूक झाली तर त्यासाठी देखील पक्षाची तयारी असायला हवी म्हणून त्याचाही आढावा घेतला जाणार आहे.