शरद पवारांच्या सीटवर गुलाबराव पाटील; ‘राजधानी’ साक्षीला, मुंबई ते जळगावपर्यंतचा प्रवास सोबतीने
By विलास.बारी | Updated: June 15, 2023 19:55 IST2023-06-15T19:54:59+5:302023-06-15T19:55:15+5:30
बोगीत दाखल झालेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सीटवर बसून पुस्तक वाचत असलेले शरद पवार दिसले.

शरद पवारांच्या सीटवर गुलाबराव पाटील; ‘राजधानी’ साक्षीला, मुंबई ते जळगावपर्यंतचा प्रवास सोबतीने
जळगाव : मुंबईहून जळगावकडे निघण्यासाठी राजधानी एक्स्प्रेस निघाली. बोगीत दाखल झालेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सीटवर बसून पुस्तक वाचत असलेले शरद पवार दिसले. तेव्हा गुलाबरावांनी पवारांकडे धाव घेतली. पवारांना भेटून त्यांनी नमस्कार केला आणि सोबतच बसलेल्या पवार-पाटील यांच्यात प्रवासादरम्यान बराच वेळ गप्पाही झाल्या.
गुरुवारी दुपारी ४ वाजता मुंबईहून राजधानी एक्स्प्रेस निघाली. अमळनेरातील कार्यक्रमासाठी शरद पवारही याच रेल्वेगाडीने निघाले. हातात वाचनासाठी पुस्तक आणि मोबाइल सोबत असताना ते सीटवर बसले. त्याच बोगीत असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शरद पवारही आपल्याच बोगीत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा गुलाबराव सरळ पवारांकडे गेले. पवारांना नमस्कार केल्यानंतर गुलाबराव उभ्या जागीच गप्पा करीत गेले. तेव्हा पवारांनी ‘बसा’ म्हणत साद भरली. शरद पवारांच्या सीटवर गुलाबराव पाटील, हे चित्र पाहून रेल्वेगाडीतल्या काही जाणकारांनीही हातात मोबाइल घेतले आणि फोटो टिपले. पवारांनी पाणीपुरवठा योजनांसंदर्भात गुलाबरावांना माहिती विचारली. नव्या योजनांविषयी अडचणींवरही चर्चा केली. ही वेळ चर्चा झाल्यावर पवारांनी पुस्तक हाती घेतले. तेव्हा गुलाबरावांनी ‘येतो साहेब’ म्हणत स्वत:ची सीट गाठली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नव्हती.