चौकशी समितीवरच शानभाग विद्यालयाचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:17+5:302021-07-14T04:19:17+5:30
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब.गो.शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. नुकतीच ...

चौकशी समितीवरच शानभाग विद्यालयाचा आक्षेप
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब.गो.शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. नुकतीच समितीने शाळेला भेट देत चौकशीसाठी आवश्यक असलेले दप्तर तयार ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, चक्क चौकशी समितीवर विविध आक्षेप नोंदवत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्र शानभाग विद्यालयाने शालेय पोषण आहार उपसंचालक यांना पाठविले आहे.
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहाराची तक्रार करताच, अवघ्या काही तासांमध्ये शासनाच्या संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे शिक्षणाधिकारी यांना आदेश दिले आहेत. तसेच शाळेमध्ये चौकशीसाठी अचानक काही व्यक्ती आल्या होत्या. त्यांच्यासोबत तक्रारदार होते. दरम्यान, कोणती कागदपत्रे हवीत याबाबत तक्रादार समितीला सांगत होते, असे विद्यालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अन्यायकारक चौकशीच्या प्रक्रियेविरूध्द तातडीने उच्च न्यायालयात दाद मागण्याचे संस्थेने ठरविले आहे, असेही त्या पत्रात म्हटले आहे.