अठरा महिन्यांपैकी सात महिने उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:03 IST2019-11-05T12:03:08+5:302019-11-05T12:03:46+5:30
दुर्लक्ष : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे धिम्या गतीने काम; वेळेत काम पूर्ण होणे अवघड

अठरा महिन्यांपैकी सात महिने उलटले
जळगाव : जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात १८ पैकी सात महिने उलटले आहेत. सद्यस्थितीला पुलाची पाया भरणीदेखील पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अकरा महिन्यांत हे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न संतप्त जळगावकरांतर्फे उपस्थित केला जात आहे.
रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जीर्ण झालेला शिवाजीनगर पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. रेल्वेतर्फे रेल्वेच्या हद्दीतीलच काम करण्यात येणार असून उर्वरित काम बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेऊन २५ फेब्रुवारीला पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेऊन ८ एप्रिलला पुलावरील सर्व गर्डर काढले होते. गर्डर काढल्यानंतर पुढील कामासाठी रेल्वेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाचे काम सोपविले आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु आहे.
धीम्या गतीच्या कामामुळे नागरिकांचा संताप
रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजीनगर वासियांनी पर्यायी रस्ता म्हणून तहसिल कार्यालयाजवळ गेट उभारण्याची मागणी केली होती. यासाठी तत्कालीन खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, डीआरएम, जिल्हाधिकारी यासह मनपा आयुक्तांकडे निवेदन दिले होते. तसेच यासाठी शिवाजीनगरवासियांना रेल रोको आंदोलनदेखील करावे लागले होते.
महावितरणतर्फे अद्याप निविदाच नाही... शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणतर्फे आचार संहितेनंतर निविदा काढण्यात येणार होत्या. मात्र, आचारसंहिता संपून आठवडा उलटल्यानंतरही महावितरणतर्फे अद्याप निविदा काढण्यात आलेली नसल्याने या कामाला पुन्हा विलंब होणार आहे. येत्या दोन दिवसात निविदा निघणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.