आरटीई प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन!
By अमित महाबळ | Updated: April 13, 2023 15:01 IST2023-04-13T14:57:15+5:302023-04-13T15:01:03+5:30
जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी ११,२९० अर्ज आले होते. एका जागेसाठी सरासरी तीन अर्ज होते.

आरटीई प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन!
जळगाव : शिक्षक हक्क कायद्यांतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी विनाअनुदानित स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर गुरुवारपासून प्रवेशनिश्चिती सुरू झाली. पण पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन होते.
जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी ११,२९० अर्ज आले होते. एका जागेसाठी सरासरी तीन अर्ज होते. राज्यस्तरीय लॉटरीतून २९८३ बालकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल क्रमांकावर एसएमएस केले जात आहेत. निवड झालेल्या बालकांची कागदपत्रे गटसाधन केंद्र, पंचायत समिती या ठिकाणी तपासली जाणार आहेत.
प्रवेश निश्चितीसाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत आहे. त्याची सुरुवात गुरुवार (दि.१३) पासून झाली. परंतु, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ स्लो असल्याचा अनुभव पालकांना आला. त्यामुळे त्यांना प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागत होते.
रिसीट आठवणीने घ्या..
प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करायचा आहे. प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे सोबत राहू द्या..
निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति आणि साक्षांकित प्रति त्यांनी सोबत ठेवाव्यात. अलॉटमेंट लेटरची प्रिंट पालकांनी आपल्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील सोबत ठेवावी.
वेटिंगवरील विद्यार्थ्यांनाही संधी
निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहेत. राज्यात ९४,७०० विद्यार्थ्यांची निवड यादी आहे, तर प्रतीक्षा यादीत ८११२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.