शेंदुर्णी न.प.निवडणूक : निकालानंतर सुरु झाले आरोप प्रत्यारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 16:57 IST2018-12-10T16:54:01+5:302018-12-10T16:57:57+5:30
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले तर राष्ट्रवादीने ईव्हीएममुळे भाजपाचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.

शेंदुर्णी न.प.निवडणूक : निकालानंतर सुरु झाले आरोप प्रत्यारोप
जळगाव : शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले तर राष्ट्रवादीने ईव्हीएममुळे भाजपाचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू
शेंदुर्णीतील मतदारांनी भाजपावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले. गतकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासाची ही पावती आहे. निकाल लागला प्रचंड मतांनी विजयी झाल्याचा आनंद आहे. निकाल लागला राजकारण संपले. आता समाजकारणातून गावाचा विकास करून नगरपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रयत्न राहिल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करून सांस्कृतिक वारसा परंपरा जतन करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारांचा आशिर्वाद मात्र ईव्हीएममुळे पराभव
सर्व समाजातील मतदारांनी आम्हाला भरघोस मतदान करीत आशीर्वाद दिला. पराभव हा आमचा व उमेदवारांचा नसून हा ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून तांत्रिक पराभव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांनी सांगितले. आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून त्याच्या विरोधात होतो. बॅलेट पेपर मतदान व्हावे अशी मागणी महाराष्ट्र दिन १ मे पासून करत होतो. परंतु आमची मागणी शेवटपर्यंत फेटाळण्यात आली. खरी लोकशाही संविधान रूपाने चालवायचे असेल तर बॅलेट पेपर नेच मतदान व्हावे अशी मागणी आजही कायम आहे. एकटी माझी लढाई नसून देशातील भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्षांचे एकत्र लढाई सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणतीही निवडणूक बॅलेट पेपरद्वारे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.