स्कूटी लावली अन् धूमस्टाईल लांबविली पोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:34+5:302021-07-31T04:18:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : जेवणासाठी दुपारी घरी आलेल्या सुमन रवींद्र साळुंखे या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत ...

स्कूटी लावली अन् धूमस्टाईल लांबविली पोत
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : जेवणासाठी दुपारी घरी आलेल्या सुमन रवींद्र साळुंखे या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने पळवून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता श्रीपत नगरात घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी दोघा चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पंचायत समितीत नोकरीस असलेल्या सुमन साळुंखे ह्या दुपारी जेवणासाठी घरी जाताना त्यांनी घराजवळ स्कूटी लावताच तेथे दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर दिसले. त्यापैकी मागे बसलेला एक इसम खाली उतरून तो त्यांच्याजवळ आला व त्याने काही क्षणांतच त्यांच्या मानेवर थाप मारून ५६ हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत ओढली व लगेच मोटारसायकलवरून पसार झाले.
घटना घडताच महिलेने आरडाओरडा करताच परिसरातील लोक तेथे आले. तोपर्यंत दोघे इसम तेथून निघून गेले. हे दोन्ही इसम २० ते २५ वयोगटातील असून त्यांनी तोंडाला काळ्या रंगाचे मास्क लावले होते. त्या महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहे.