शाळा परिसर गजबजला महाविद्यालये मात्र सुने सुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:10+5:302021-02-05T06:00:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा आलेख खाली ...

शाळा परिसर गजबजला महाविद्यालये मात्र सुने सुने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे महाविद्यालये मात्र बंदच आहेत. महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे. महाविद्यालय सुरू व्हावीत, म्हणून आता विद्यार्थ्यांकडून आंदोलने सुरू झाली आहेत.
सन २०२०मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. यामधून शिक्षणक्षेत्रही सुटू शकले नाही. डिसेंबर महिन्याच्या ८ तारखेला जळगाव जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वाजली. त्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. दुसरीकडे, महाविद्यालये अद्याप सुरू झाली नाहीत. इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, असे असतानाही नेमकी महाविद्यालयेच बंद का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
०००००००००००००००
शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१च्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आता महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे.
- सिद्धेश्वर लटपटे, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री, अभाविप
०००००००००००००
सध्या कोरोनाची स्थिती पाहता धोका अजून टळलेला नाही. पण, शाळांप्रमाणे महाविद्यालयसुध्दा सुरू व्हावीत. महाविद्यालय सुरू करत असताना शासकीय नियमांची अंमलबजावणी नक्की करावी. याची महाविद्यालय प्रशासनानेसुध्दा काळजी घ्यावी. त्यानंतर महाविद्यालय सुरू करण्यात यावे.
- अंकित कासार, विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी, युवासेना
०००००००००००००००००
पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता महाविद्यालयेसुध्दा सर्व सुविधांसह सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालये सुरू केव्हा होणार, याकडे लक्ष लागून आहे.
- कोमल साळुंखे, विद्यार्थिनी
००००००००००००००००००
काही दिवसांपूर्वी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. प्रतीक्षा आहे ती महाविद्यालये सुरू होण्याची. ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गात बसून मिळालेले शिक्षण फायदेशीर आहे. ऑनलाईनमध्ये अनेक वेळा व्यत्यय येतो. त्यामुळे महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे.
- स्वप्नील चौधरी, विद्यार्थी