School bus busted by corporator husband | नगरसेविका पतीने अडविली स्कूल बस
नगरसेविका पतीने अडविली स्कूल बस

जळगाव : आपल्या गल्लीतून जाणारी शाळकरी मुलांची बस भाजप नगरसेविकेच्या पतीसह पाच ते सहा रहिवाश्यांनी अडविल्याची तक्रार रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने केली आहे. मंगळवारी सकाळी ८़१५ वाजता आदर्शनगरातील लायन्स हॉलजवळ तब्बल पाऊण तास ही बस अडवून ठेवण्यात आल्यामुळे मुलांना शाळेत जाण्यास उशिर झाला़ अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बस मार्गस्थ झाली़
याबाबत स्कूल प्रशासनाकडून नगरसेविका पती बाळासाहेब चव्हाण, मनीष चव्हाण, आकाश चव्हाण, नथ्थु चौधरी, प्रवीण मुळे यांच्यासह इतरांविरूध्द रामानंदनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे़
स्कूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले की, जळगाव-शिरसोली रस्त्यावर असलेल्या रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी सकाळी ७ व नंतर ८ वाजेच्या सुमारास शाळेतील स्कूल बस सोडण्यात येत असते़
शाळकरी मुलांना मुख्य रस्त्यांवर न बोलविता बस ही विद्यार्थ्यांना घराच्या काही अंतरापर्यंत घेण्यासाठी येत असते़ त्यानुसार मंगळवारी बसचा चालक हा एमएच़१९, वाय़ ७००२ क्रमांकाची बस घेऊन सकाळी ८़१५ वाजेच्या सुमारास आदर्शनगरातील लायन्स हॉलजवळील गल्लीतून विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती बाळासाहेब चव्हाण तसेच मनीष उमेश चव्हाण, आकाश उमेश चव्हाण, नथ्थु बारकू चौधरी, प्रवीण मधुकर मुळे यांच्यासह काही रहिवाश्यांनी बस अडवून आमची वाहने येथे उभी राहतात, गल्लीतून बस जाऊ देणार नाही, असे म्हणत चालकाशी अरेरावी करीत शिवीगाळ केली.
हा वाद पाहून विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते़
स्कूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी
या प्रकाराची माहिती चालकाने स्कूल प्रशासनाला कळविली. यावर स्कूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी रहिवाश्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़
पोलिसात दिली तक्रार
शाळेची बस अडवून अर्वाच्च भाषेत कर्मचाऱ्यांशी बोलून शिवीगाळ केली म्हणून मंगळवारी सकाळी बस निरिक्षक सुनील एकनाथ पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नगरसेविका पती बाळासाहेब चव्हाण, मनीष चव्हाण, आकाश चव्हाण, नथ्थु चौधरी, प्रवीण मुळे यांच्यासह इतरांविरूध्द तक्रार दिली.

आधीही दिली धमकी
शुक्रवार, ८ रोजी सुध्दा लायन्स हॉल परिसरातील याच रहिवाश्यांकडून बस अडवून आपल्या गल्लीतून बस घेऊन जायची नाही, अशी धमकी दिली होती़, असेही तक्रारीत म्हटले आहे़ दरम्यान, गल्लीत वाहने उभी असतात, त्यांना धडक बसेल या कारणाने बस अडविण्यात आल्याचा रहिवाशांचा दावा असल्याचे कळते.

तब्बल पाऊण तास विद्यार्थी खोळंबले...
तब्बल पाऊण तास ही बस अडविण्यात आली़ यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उशिर झाला. संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी रहिवासी बस अडवू शकत नाही, अशी तंबी दिली आणि समजूत घातली़
 

Web Title: School bus busted by corporator husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.