जळगावात काट्याच्या लढतींवर सट्टाबाजार तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:30 IST2018-07-21T15:28:12+5:302018-07-21T15:30:20+5:30
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आता प्रचारालाही जोर चढणार आहे. यंदा भाजपा, शिवसेना व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी दरम्यान तिरंगी काट्याची लढत रंगणार आहे.

जळगावात काट्याच्या लढतींवर सट्टाबाजार तेजीत
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आता प्रचारालाही जोर चढणार आहे. यंदा भाजपा, शिवसेना व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी दरम्यान तिरंगी काट्याची लढत रंगणार आहे. यासाठी सट्टा बाजारात आतापासून राजकीय पक्षांवर सट्टा लावला जात आहे. काही कोटींचा सट्टा मनपा निवडणुकीवर लावायला सुरुवात झाली असून, एकुण निकालासह प्रभागनिहाय उमेदवारांवर देखील सट्टा लावला जात आहे.
भाजपा, शिवसेना व आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे सांगणे कठीण आहे. निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे. भाजपा व शिवसेनेमधील काट्याची लढत पाहता बुकींमध्ये देखील संभ्रमावस्था आहे. बुकींकडून सावधपणेच सट्टा लावला जात असून सर्वच राजकीय घडामोडी व इतर चर्चांच्या आधारावरच सध्या सट्टा लावला जात आहे. निवडणुकीआधी युती झाली नाही मात्र निवडणुकीनंतर युती होईल की नाही ? यावर देखील सट्टा लावण्यात येत आहे. तसेच महापौर पदावर देखील सट्टा लावला जात असल्याची माहिती बुकींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. संपूर्ण निवडणुकीवर निकालापर्यंत ५०० ते ६०० कोटींपर्यंत सट्टाबाजाराची उलाढाल होण्याची शक्यता आहे.