शेंदुर्णी येथे वाहन चालकाला मारहाणप्रकरणी संजय गरूड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:09 IST2018-12-09T13:07:51+5:302018-12-09T13:09:10+5:30
गाडीवर काही जणांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या

शेंदुर्णी येथे वाहन चालकाला मारहाणप्रकरणी संजय गरूड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पहूर, जि. जळगाव : शेंदुर्णी येथे वाहन चालकाला मारहाण व पैसे, सोन्याची साखळी हिसकावल्या प्रकरणी संजय गरूड यांच्यासह भाऊ, मुलगा व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध दंगल, दरोड्याचा गुन्हा पहूर पोलिसात दाखल झाला आहे.
शेंदुर्णीजवळील सोयगाव रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एक चारचाकी गाडी संशयास्पद स्थितीत आढळल्याने या गाडीवर काही जणांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
एम.एच १९ ए. एक्स ६५६१ क्रमांकाची चारचाकी गाडी शेंदूर्णीजवळील सोयगाव रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे काही लोकांनी गाडीवर चाल करून दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या व गाडीचालक स्वामी नारायण पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. ही घटना संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती विचारली असता पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहे. सदर गाडीचा चालक हा जामनेर येथील रहिवासी असून जामनेर नगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी असल्याचे समजते. पैसे वाटण्यासाठी ही गाडी आली असेल या संशयावरून गाडीवर दगडफेक झाल्याचे कळते.