वाळू साठे, योजनांमधील गैरव्यवहाराची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:18+5:302021-07-27T04:18:18+5:30
शासकीय योजना राबविताना त्यात कोठे ना कोठे, काही ना काही गैरव्यवहार होणे आता जणू नित्याचेच झाले आहे. जिल्ह्यातील वाळू ...

वाळू साठे, योजनांमधील गैरव्यवहाराची मालिका
शासकीय योजना राबविताना त्यात कोठे ना कोठे, काही ना काही गैरव्यवहार होणे आता जणू नित्याचेच झाले आहे. जिल्ह्यातील वाळू साठ्यांमध्ये गैरप्रकार होत असताना कोरोना संकटातही शासकीय योजनांमध्ये गैरव्यवहार होऊन त्याच्या चौकशीचे आदेश निघत आहे. अशाच प्रकारे आता महिला बचत गटांना काम मिळावे म्हणून मानव विकास मिशनमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात कापडी पिशवी युनिट साहित्याच्या खरेदीत गैरव्यवहाराच्या संशयावरून तक्रार झाली व त्या विषयी चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळूच्या साठ्यांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. यात जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामात मर्यादेपेक्षा अधिक वाळूचा साठा आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला तब्बल ३८ लाखापेक्षा अधिक दंड ठोठावण्यात आला. या दंडाच्या रकमेवरूनच लक्षात येते की, किती मोठ्या प्रमाणात वाळूमध्ये गैरव्यवहार होत असतील. विशेष म्हणजे शासकीय ठेक्यामध्ये एवढी वाळू असू शकते तर खाजगी व्यक्तींकडून किती साठा केला जात जाऊ शकतो, याचाही अंदाज येऊ शकतो. या वाळूसाळ्यासह दापोरा शिवारातदेखील कोणतीही परवानगी न घेता वाळू साठा केल्याचे व तोही माती मिश्रित असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी तहसीलदारांनी नोटीस बजावली. या शिवाय मेहरुण परिसरातील साठा, औद्योगिक वसाहत परिसरातील साठा असे अनेक वाळूचे साठे आढळून आले. वाळूमध्ये असे गैरप्रकार सुरू असताना आता शासकीय योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात कापडी पिशवी युनिट साहित्य शिलाई मशिन, कटिंग मशिन इतर साहित्याची खरेदी करण्यात गैरव्यवहार असल्याच्या संशयावरून या खरेदीच्या चौकशीची मागणी झाली. या खरेदीमध्ये खरेदी केलेले साहित्य बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीत खरेदी केल्याचा संशय व्यक्त करीत काही मुद्यांवर प्रशासकीय मान्यतेचे उल्लंघन केल्याचाही आरोप होऊ लागला. या विषयी तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत काही बाबींमध्ये अनियमितता आढळून आली असल्याचेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना यंत्रणा त्यात अडकते. तरीदेखील काही ठिकाणी गैरव्यवहार, गैरप्रकार थांबत नसल्याचे वारंवार पुढे येत आहे. एकूणच स्थिती पाहता वाळू साठे असो की शासकीय योजनांमध्ये गैरव्यवहाराची संधी कोठे सोडली जात नाही, असेच दिसून येते.