वेतन झाले, मात्र रखडलेल्या वैद्यकीय बिलांचा खर्च कधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:19+5:302021-09-12T04:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून रखडलेेले वेतन नुकतेच झाले आहे. मात्र, कोरोना उपचारावरील ...

वेतन झाले, मात्र रखडलेल्या वैद्यकीय बिलांचा खर्च कधी मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून रखडलेेले वेतन नुकतेच झाले आहे. मात्र, कोरोना उपचारावरील वैद्यकीय खर्चाची बिले अद्यापही मिळालेली नाहीत. अनेक महिन्यांपासून वैद्यकीय खर्चाची बिले मिळालेली नसल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी कर्ज काढलेल्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी खासगी रूग्णालयातून उपचार घेतले. काही कर्मचाऱ्यांची कोरोनामुळे अधिक प्रमाणात प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी लाखो रूपयांचा खर्च आला. या उपचारांसाठी काही कर्मचाऱ्यांनी विविध पतसंस्था व सोसायट्यांचे कर्ज काढले आहे. मात्र, महामंडळाच्या जळगाव विभागातील लेखा विभागाकडे अनेक महिन्यांपासून वैद्यकीय खर्चाची बिले सादर करूनही महामंडळाकडून उपचाराचा खर्च मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी घेतलेले कर्ज फेडताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध आगार मिळून ५०हून अधिक कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश असून, वैद्यकीय खर्चाची बिले कधी मिळणार, यासाठी हे कर्मचारी लेखा विभागाकडे दररोज पाठपुरावा करत आहेत.
इन्फो :
पगार वेळेवर होत नसल्याने अधिक अडचण :
सध्या बससेवा नियमित सुरू झाली असली, तरी अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे दोन महिने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. दर महिन्याला पगार वेळेवर होत नसल्यामुळे, पतसंस्था आणि सोसायट्यांकडून घेतलेले कर्जाचे हप्तेही या कर्मचाऱ्यांना विलंबाने फेडावे लागत आहेत. त्यात विलंबाने भरल्या जाणाऱ्या हप्त्यावर दंडही भरावा लागत असल्याने या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
इन्फो :
कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलांचा खर्च मिळण्याबाबत महामंडळाकडे निधीची मागणी केली आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जसा निधी येईल, तसे वैद्यकीय खर्चाच्या बिलांचे पैसे देण्यात येणार आहेत.
- अल्पेश सोलंकी, विभागीय लेखा अधिकारी, एस. टी. महामंडळ