साकेगावचे ग्रामीण रुग्णालय हायटेक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:09+5:302021-09-19T04:17:09+5:30
भुसावळ: जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या शहरासह तालुक्यातील नागरिकांना एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळगाव सामान्य रुग्णालय किंवा ...

साकेगावचे ग्रामीण रुग्णालय हायटेक होणार
भुसावळ: जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या शहरासह तालुक्यातील नागरिकांना एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळगाव सामान्य रुग्णालय किंवा वरणगाव येथे जावे लागते. मात्र, आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरच्या उर्वरित कामासाठी जिल्हा नियोजन समितीने तब्बल चार कोटी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातूनच साकेगावच्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत शवविच्छेदन कक्षाची निर्मिती होईल, तसेच भरघोस निधी मिळाल्याने भविष्यात ट्रामा सेंटर हायटेक होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये विविध कामांसाठी आमदारांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दिला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. ४ कोटी २१ लाखांच्या निधीतून ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये उर्वरित बांधकाम केले जाईल. यात नवीन शवविच्छेदन कक्ष बांधकाम करणे, ९०० मीटर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, दोन्ही इमारतींना जोडणाऱ्या कॉरिडोरचे बांधकाम करणे, अंतर्गत रस्ते व डांबरीकरणाचे काम पूर्ण करणे, पार्किंग शेड बांधकाम, पंपहाउस व बोअरवेल बांधकाम, मेडिकल वेस्ट डिस्पोजल टँक बांधकाम, पेव्हर ब्लॉक व फ्लॅग पोस्ट बनविणे आदी कामे पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल.
जळगाव वरणगावचे हेलपाटे थांबणार
शहर व तालुक्यात दुर्दैवाने एखादी घटना घडल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव किंवा वरणगाव येथे शवविच्छेदन करण्यासाठी नातेवाइकांना हेलपाटे मारावे लागत होते. आता मात्र, रुग्णसेवेशी थेट संबंधित कामे असल्याने, या कामांना मंजुरीनंतर तत्काळ गती दिली जाणार असून, शवविच्छेदन कक्षामुळे स्थानिक स्तरावर शवविच्छेदन होणार असून, नातेवाइकांचा मनस्ताप कमी होणार आहे. ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या इमारत परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासह अन्य सर्वच कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने, निधी मंजुरीनंतर आता कामांना वेग येणार आहे.