पाचोरा (जि. जळगाव) : पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या गाडीखाली येऊन जवळपास ७ ते ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान बुधवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान घडली. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेस ही जळगावहून पाचोऱ्याकडे जात होती. त्यावेळी वाटेत परधाडे - माहेजी दरम्यान गाडीला आग लागल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. यानंतर काही वेळातच प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने कर्नाटक एक्सप्रेस आली. त्याखाली येऊन सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील बहुतेक प्रवासी हे उत्तर प्रदेश आणि बिहारकडील होते.
सायंकाळी ६:१५ वाजता पाच ते सहा जखमींना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अपघातानंतर पुष्पक एक्सप्रेस पाचेारा येथे पोहचली. तेथून ती ६:२० वाजता मुंबईकडे रवाना झाली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे जळगाव आणि भुसावळ येथील अधिकारी पाचोऱ्याकडे रवाना झाले आहेत.