कडधान्याच्या आयातीवर निर्बंध, डाळी आणखी कडाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:54 IST2019-04-08T14:53:50+5:302019-04-08T14:54:48+5:30

हरभरा आयातीवर तर पूर्णपणे बंदी

Restraint on import of cereals, pulses will be more | कडधान्याच्या आयातीवर निर्बंध, डाळी आणखी कडाडणार

कडधान्याच्या आयातीवर निर्बंध, डाळी आणखी कडाडणार


जळगाव : डाळ निर्मितीसाठी विदेशातून आयात होणाऱ्या उडीद, मूग, तूर, वटाणे या कच्च्या मालाच्या आयातीच्या प्रमाणावर केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. कोणता माल किती मागवावा याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. यात हरभरा आयातीवर तर पूर्णपणे बंदी घातली आहे. या निर्णयामुळे सध्याच्या आयातीच्या तुलनेत केवळ १५ टक्केच कच्चा माल आयात करता येणार आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार असून दालमिलच्या उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने कडधान्याच्या उत्पन्नावर परिणाम होऊन आवक घटली होती. असे असले तरी कडधान्याचे व डाळींचे भाव वाढत नसल्याचे चित्र बाजारपेठेत होते. विशेष म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही हे दर कमी होते. यात विदेशातून येणाºया मालामुळे पुरेसा माल उपलब्ध होऊ लागला. परिणामी भारतातील शेतकºयाच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने विदेशातून येणाºया कच्च्या मालाच्या प्रमाणावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेत २९ मार्च रोजी तसे परिपत्रक काढून कडधान्याच्या आयातीवर निर्बंध आणले. याचा परिणाम म्हणजे डाळींचे भाव ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने एकाच आठवड्यात वाढले.
पहिल्याच आठवड्यात परिणाम
सरकारने निर्बंध घातल्यानंतर डाळींचे भाव पहिल्याच आठवड्यापासून वाढण्यास सुरुवात झाली. सर्वच डाळींचे भाव ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढले. यात गेल्या आठवड्यात ६८०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७२०० ते ७६०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.
उडीदाची डाळही ५२०० ते ५५०० रुपयांवरून ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यात ५३०० ते ५६०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ७३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटलवरून ७६०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.
पावसाचे अंदाजही भाववाढीस कारणीभूत
सरकारने निर्बंध घालण्यासह डाळींच्या भाववाढीस दुसरे कारण ठरत आहे ते म्हणजे पावसाच्या अंदाजाचे. यंदाही पाऊस सात ते आठ टक्क्याने कमी होणार असल्याचे अंदाज वर्तविले जात असल्याने कच्च्या मालाच्या साठवणुकीतून डाळींमध्ये भाववाढ होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
असे आहे निर्बंध
सरकारच्या धोरणानुसार या पूर्वी दालमिल चालक विदेशातून कितीही माल आयात करू शकत होते. मात्र आता सरकारने यावर निर्बंध घालत प्रमाण ठरवून दिले आहे. त्यात हरभºयाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली असून तो भारतात आयात करता येणार नाही. या सोबतच देशभरात एका वर्षात तूर केवळ २ लाख टन आयात करता येणार आहे. अशाच प्रकारे उडीद-मूग हे प्रत्येकी दीड लाख टन प्रती वर्ष आयात करता येतील. वर्षभरासाठी हा निर्णय असून पुढील वर्षी याबाबत काय धोरण ठरते, या बाबतही चिंता आतापासूनच असल्याचे सांगितले जात आहे.
प्रमाण घटून आले १५ ते २० टक्क्यांवर
हे निर्बंध घालण्यापूर्वी म्यानमार येथून सर्वात जास्त कच्चा माल आयात होत असे. यात १० लाख टन तूर, ६ ते ७ लाख टन मूग, ७ ते ८ लाख टन उडीद म्यानमार येथून भारतात येत असे तर १० लाख टन हरभरा आॅस्ट्रेलियातून दरवर्षी आयात होत असे. आता हरभºयावर पूर्णपणे बंदी घातली आहे. कॅनडामधूनही २० लाख टन वटाणा आयात केला जात होता.
उत्पादनावर परिणाम नाही, मात्र भाववाढ अटळ
कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध घातले असले तरी त्याचा दालमिलच्या उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे दालमिल चालकांनी सांगितले. कारण भारतातील माल खरेदी करता येणार असून त्यामुळे भारतीय मालाला भाव मिळण्यासही वाव आहे. मात्र दुसरीकडे डाळींची भाववाढ अटळ असल्याचे संकेत दिले जात आहे. दरम्यान, एकट्या जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. निर्बंध घातल्याने आणखी काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Restraint on import of cereals, pulses will be more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.