सभासदांचे म्हणणे ऐकूण न घेता मंजूर केले ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:15+5:302021-09-06T04:21:15+5:30
जळगाव : शेतकऱ्यांची बँक म्हणविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडू न देता व केवळ ...

सभासदांचे म्हणणे ऐकूण न घेता मंजूर केले ठराव
जळगाव : शेतकऱ्यांची बँक म्हणविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडू न देता व केवळ मोजक्या संचालकांचे म्हणणे ऐकूण घेत ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप शिरुड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. सुभाष पाटील यांनी केला आहे. ऑनलाईन पद्धतीच्या या सभेत सभासदांचे मोबाईल म्यूट करून ठेवल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ५ सप्टेंबर रोजी बँकेच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, नानासाहेब देशमुख, आमदार सुरेश भोळे, राजेंद्र राठोड, गणेश नेहते, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख सभागृहात उपस्थित होते, तर जवळपास ३५० सभासद ऑनलाईन सहभागी झाले होते.
सर्व ठराव मंजूर
२०२१-२२ या वर्षासाठी बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षणासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यासह अजेंड्यातील सर्व ९ ठराव मंजूर करण्यात आले.
मोजक्या सभासदांनी मंजूर केले ठराव
बँकेच्या या बैठकीला सभासदांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी सांगितले. मात्र, केवळ संचालकांचे मोबाईल सुरू ठेवत इतरांचे म्हणणे ऐकून न घेण्यासाठी त्यांचे मोबाईल म्यूट करून ठेवण्यात आल्याचा आरोप शिरुड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रा. सुभाष पाटील यांनी केला आहे. यावेळी उपस्थित सभासदांनी ठरावांना मंजुरी दिली व हे ठराव संमत करण्यात आल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल
शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असो की त्यांना मिळणाऱ्या कर्जाचा विषय असो, या संदर्भात मुद्दे मांडायचे असताना सभासदांना बोलू दिले गेले नाही. मयत सभासदांच्या वारसांना निम्मेच कर्ज दिले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, एटीएममुळे शेतकऱ्यांना विनाकरण भुर्दंड सहन करावा लागत आहे, असे अनेक प्रश्न असताना बँक त्याकडे लक्ष देत नसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला एकप्रकारे बगल देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मात्र बँकेच्यावतीने इन्कार करण्यात आला आहे.
ऑनलाईन बैठकीसाठी सभासदांना सहभागी व्हायचे होते. मात्र, प्रा. सुभाष पाटील हे शेतात व त्यांचा आवाज व्यवस्थित येत नव्हता. वारंवार लिंक तुटत होती. कोणाचाही मोबाईल म्यूट केला नव्हता.
- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी बँक.