चोरलेल्या दुचाकीचा नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:53 IST2018-08-29T12:42:33+5:302018-08-29T16:53:52+5:30
दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल न करता त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.

चोरलेल्या दुचाकीचा नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून वापर
जळगाव - चोरलेल्या दुचाकीची नंबर प्लेट व सीट कव्हर बदलून तिचा वापर करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल न करता त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, दोघांकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघांनी हा पहिलाच गुन्हा केला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी अमोल प्रकाश पाटील (रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) हे १४ आॅगस्ट रोजी परिवारासह दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.व्ही.४२८८) बीग बाजारमध्ये खरेदीसाठी आले होते. त्यांनी दुचाकी पार्कींगमध्ये लावली होती. खरेदी झाल्यानंतर परत आल्यावर जागेवर दुचाकी जागेवर नव्हती. याप्रकरणी पाटील यांनी २६ आॅगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, अमोल पाटील यांची दुचाकी दोन अल्पवयीन मुलांनी चोरल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनील पाटील,रतन गिते, प्रनेश ठाकूर, दीपक सोनवणे यांच्या पथकाने सोमवारी रात्री जैनाबाद येथे जावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी या दुचाकीची नंबर प्लेट व सीट कव्हर बदलविले होते. त्या दुचाकीचा शहरातच वापर सुरु केला होता. यातील एक मुलगा रायपुर, ता.भुसावळ येथील आहे. दोघांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून एक जण शेती काम तर दुसरा दुकानावर कामाला आहे. घरी संशय येऊ नये म्हणून दोन्ही जण रात्री जिल्हा रुग्णालयात दुचाकी लावत होते.