जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नूतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:36+5:302021-07-31T04:18:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी पशुवैद्यकीय दवाखाने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून असुविधादेखील आहेत. यामुळे पशुपालकांचे ...

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नूतनीकरण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी पशुवैद्यकीय दवाखाने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून असुविधादेखील आहेत. यामुळे पशुपालकांचे हाल होत आहे. या दवाखान्यांचे नूतनीकरणासोबतच नागपूर - पंढरपूर अशी रेल्वेसेवा जळगावमार्गे सुरू करा, अशी मागणी वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पवार यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी त्यांनी हे निवेदन खा. पाटील यांना दिले आहे.
फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शहरात व ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने होते. यातील काही मोडकळीस आले आहे. काहींना कुलपेही लागली आहे. अशा स्थितीत बहुतांशी दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. प्राण्यांसाठी लागणारे औषधींचीही मारामार आहे. याचा सर्वाधिक फटका पशुपालक व शेतकऱ्यांना बसत आहे.
या दवाखान्यांचे नूतनीकरण केल्यास शेतीपूरक व्यवसायाला मदत होईल. बेरोजगारांना रोजगार निर्माण होईल. पशुमृत्युंनाही आळा बसेल. खासगी उपचार करण्यासाठी पशुपालकांना सोसावा लागणारा भुर्दंडदेखील सोसावा लागणार नाही.
संतभूमी एक्सप्रेस सुरू करा
नागपूर ते पंढरपूर लातूर नांदेड मार्गे रेल्वेसेवा उपलब्ध आहे. या मार्गावरही नवीन रेल्वे नागपूर-पंढरपूर (जळगाव मार्गे) सुरू करावी, अशीही मागणीही निवेदनात केली आहे. परिसरातील भाविकांना संतभूमी शेगाव, शिर्डी साईबाबा, पुणे, आळंदी तसेच पंढरपूर या अनेक ठिकाणी रेल्वेने प्रवास करता येईल. जिल्ह्यात पंढरपूर परिसरातील अनेक लोक वास्तव्यास आहे. त्यांनाही आपल्या गावाकडे जाणे सोयीचे होईल. नागपूर-पंढरपूर मार्गावर संत भूमी एक्सप्रेस सुरू केल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे.