बंडखोर नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना बजावला व्हीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:26+5:302021-07-11T04:12:26+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजप बंडखोरांनी स्वतंत्र गटनेता व उपगटनेत्याची निवड केल्यानंतर आता सोमवारी होणाऱ्या प्रभाग ...

बंडखोर नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना बजावला व्हीप
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजप बंडखोरांनी स्वतंत्र गटनेता व उपगटनेत्याची निवड केल्यानंतर आता सोमवारी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप बंडखोरांच्या गटनेत्यांनी व्हीप काढून भाजपच्या सर्व नगरसेवकांना बंडखोरांनी निश्चित म्हणजेच भाजपने दिलेल्या उमेदवारांना मतदान करण्याचा सूचना दिल्या आहेत. बंडखोरांनी भाजप नगरसेवकांना अडचणीत आणण्यासाठी नवीन खेळी खेळली असून, आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग समिती सभापतीची निवडणूक १२ रोजी होणार आहेत. प्रभाग समिती १ मध्ये प्रा.सचिन पाटील यांची जागा बिनविरोध झाली असली तरी इतर तीन प्रभागात भाजप विरुध्द भाजप बंडखोर अशी लढत रंगणार आहे. भाजप बंडखोर नगरसेवक अजूनही पक्षात असल्याचे सांगत बंडखोरांनी बहुमताच्या जोरावर ॲड.दिलीप पोकळे यांना भाजपचे गटनेतेपद देण्याचे निश्चित केले आहे. तसेच महापौरांनीदेखील या प्रस्तावाला मान्यता देऊन नवीन गटनेत्यांना सर्व अधिकार देण्याचा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसारच नवीन गटनेत्यांना पदाचा व अधिकारांचा वापर करून, भाजप नगरसेवकांनाच प्रभाग समिती सभापतीच्या निवडीसाठी व्हीप बजावून भाजपसमोर नवीन अडचण उभी केली आहे.
..तर दाखल केला जाईल अपात्रतेचा प्रस्ताव
प्रभाग समिती सभापतीपदासाठी बंडखोरांनी प्रवीण कोल्हे, रेखा पाटील, शेख हसीना यांना संधी दिली आहे. या उमेदवारांना या निवडणुकीत सर्व नगरसेवकांनी मतदान करावे, असे आदेश गटनेत्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच यांना मतदान न केल्यास भाजपच्या उर्वरित नगरसेवकांवर बंडखोर नगरसेवकांकडून अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्याची तयारी बंडखोर नगरसेवकांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच खेळीच्या जोरावर बंडखोरांनी नवीन रणनीती आखली आहे.
कोट..
बंडखोरांच्या व्हीपला कोणताही अर्थ नाही, गटनेत्यांची त्यांनी केलेली निवड ही अनधिकृत असून, त्यांचा व्हीप भाजप नगरसेवकांना लागूच पडूच शकत नाही. त्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव दाखल आहे. त्याविरोधात विभागीय आयुक्तांकडून नोटिसा आल्या आहेत. असे असताना हा व्हीप लागू होऊ शकत नाही.
-विशाल त्रिपाठी, जिल्हा महानगर सरचिटणीस