वाचन आणि उजळणीचा एमपीएससी परीक्षेत झाला फायदा- प्रियेश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:21 PM2020-08-29T23:21:30+5:302020-08-29T23:23:08+5:30

रीडिंग, रिव्हीजन, रिमेंबर या तंत्राचा वापर करायचो आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झाला

Reading and revision benefit in MPSC exam- Priyesh Mahajan | वाचन आणि उजळणीचा एमपीएससी परीक्षेत झाला फायदा- प्रियेश महाजन

वाचन आणि उजळणीचा एमपीएससी परीक्षेत झाला फायदा- प्रियेश महाजन

Next
ठळक मुद्देलोकमत संडे स्पेशल मुलाखत सातत्याने तिसऱ्यांदा मिळाले यशप्रियेश महाजन यांची उपजिल्हाधिकारी पदी झाली निवड सतत राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा अनुत्तीर्ण होत असाल तर या क्षेत्रापेक्षा दुसरेही क्षेत्र छान आहेत. -प्रियेश महाजन

रवींद्र मोराणकर
जळगाव : रीडिंग, रिव्हीजन, रिमेंबर या तंत्राचा वापर करायचो आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झाला असल्याचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले मोठे वाघोदे, ता.रावेर येथील प्रियेश लखुचंद महाजन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
२०१७ मध्ये नगरपालिका मुख्याधिकारी, २०१८ च्या एमपीएससी परीक्षेत असिस्टंट कमिशनर आॅफ स्टेट टॅक्स (जीएसटी) गट अ या पदावर निवड झाल्यानंतर २०१९च्या परीक्षेत उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या या तरुणाशी साधलेला संवाद.
अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर खासगी कंपनीत काम करीत असताना आपण अजून काय छान करू शकतो ज्याचा समाजातील लोकांना जास्तीत जास्त आणि थेट फायदा होईल हा विचार सतत मनात घोळायचा. म्हणून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षेत सलग चार वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी थोड्या गुणांनी यश हुलकावणी देत होते. यातून खचून न जाता पुढच्या वर्षी मी अजून जोरात प्रयत्न करेल, असं स्वत:शी ठरवायचो आणि पुन्हा प्रयत्न करायचो. मात्र प्रत्येक वेळी थोड्या गुणांनी मला यशापासून रोखले.
नंतर २०१७, २०१८ व २०१९ या तीन वेळेस एमपीएससी परीक्षेत यश मिळत गेले आणि ह्या सर्व परीक्षा प्रशासनात नोकरी करीत असताना उत्तीर्ण झालो आहे. सध्या पुणे येथे असिस्टंट कमिशनर आॅफ स्टेट टॅक्स (जीएसटी) या पदावर कार्यरत आहे.

अभ्यासाची पद्धत
मी नोकरी करत करत अभ्यास करत होतो. सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन-तीन तास अभ्यास करायचो. जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा कमी पुस्तकं आणि जास्त उजळणीवर भर द्यायचो. आवश्यक वाटणाºया विषयांच्या जे जास्त विसरायचो त्या टॉपिकच्या नोटस् काढायचो.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणाईला संदेश
अपयशाला न घाबरता आपले योगदान पूर्ण १०० टक्के द्या. यश आपल्याला नक्की मिळेल. कुठल्याही एका परीक्षेची तयारी करीत असले तरी बाकी परीक्षाही द्या. जेणेकरून तुमचा प्लॅन बी सुरक्षित होईल.
आज स्पर्धा परीक्षा साधारणपणे पाच लाख विद्यार्थी देतात आणि अंतिमत: ३००-४०० विद्यार्थ्यांची निवड होते. म्हणजे ०.०१ टक्केच मुले यशस्वी होतात. यामुळे आपण अभ्यासात गंभीर नसाल तर आपल्यासोबत काय होऊ शकते आपण या गोष्टींचा विचार करावा.
सतत राज्यसेवा किंवा यूपीएससीच्या पूर्व परीक्षा अनुत्तीर्ण होत असाल तर या क्षेत्रापेक्षा दुसरेही क्षेत्र खूप छान आहेत याचा नक्की आपण विचार करावा.

काय करावे आणि काय करू नये
सर्वप्रथम ही परीक्षा खूप कठीण असते हे डोक्यातून काढून टाका. पास होणाऱ्यांंमध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे शिस्तबध्द पद्धतीने, जिद्दीने मेहनत करीत तसेच संयम ठेवत अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल. परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि पुस्तकांची यादी अभ्यास सुरू करण्याआधी व्यवस्थित बघणे. कमीत कमी पुस्तके वाचणे आणि जास्तीत जास्त उजळणीवर भर देणे.

स्टॅण्डर्ड रेफर्न्स बुक्स वाचावीत. कुठलेही नवीन पुस्तक बाजारात आले म्हणून वाचू नये. अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन केले तर लवकरात लवकर यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन नक्की घेणे आणि सतत मार्गदर्शन करेल, असा मार्गदर्शक शोधावा. कारण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेबद्दल निश्चित असा दृष्टिकोन असतो आणि नवीन विद्यार्थ्यांना अ‍ॅप्रोच लवकर आत्मसात झाल्यास खूप फायदा होईल.

समस्यांना सकारात्मक दृष्टीने घ्या
स्वत:च्या अडचणी लक्षात घेऊन रडत बसण्यापेक्षा किंवा जास्त विचार करत बसण्यापेक्षा त्या समस्यांना सकारात्मक दृष्टीने घ्या आणि जोरदार प्रयत्न करा आणि यश मिळवण्यासाठी लढा. कारण अडचणी या प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना असतातच. फक्त प्रत्येकाचे स्वरूप वेगळे असते. म्हणून आपल्या ध्येयावर लक्ष द्या आणि ते मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करा.

शेवटी जाता जाता इतकंच सांगेन
असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

येणाºया परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना खूप साºया शुभेच्छा.

Web Title: Reading and revision benefit in MPSC exam- Priyesh Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.