नांद्रा येथे गावाजवळ असलेल्या श्रीराम आश्रमाला लागून असलेले शेतातील शेतकरी गोकुळ राजाराम पाटील, विनोद बाबुराव बाविस्कर, राजेंद्र महारु पाटील यांच्या बांधावरील शेतात दि. ११ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मशीन वूड कटरच्या सहाय्याने ९ चंदनाची झाडे तोडून तस्करांनी लांबवली. या झाडाचे मागील १० वर्षांपासून शेतकरी जतन करीत होते. बांधावर उगवलेल्या झाडांमधील अपेक्षितमधला चंदनगाभा शोधून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तस्करी करुन धूम ठोकली आहे.
यापूर्वीही १००८ प. पू. स्वामी विष्णूदासजी महाराज यांच्या श्रीराम आश्रमामध्ये घुसून ४ वर्षांपूर्वी अशाच चंदनाची चोरी करण्यात आली होती. त्या घटनेचे संपूर्ण चित्रण आश्रमात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांची माहिती स्वामी विष्णूदासजी महाराज यांनी पाचोरा पोलीस प्रशासनाला दिली होती. घटनेचा तपास पूर्ण न केल्याने ही पुन्हा चोरी झाली असल्याचे स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या चोरीची माहिती पोलीस पाटील किरण तावडे यांना दिल्यावर प्रथम प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत जाऊन पाहणी केली. यावेळी पंकज बाविस्कर, पत्रकार प्रा. यशवंत पवार, संजय बाविस्कर, समाधान बाविस्कर, लिलाधर बाविस्कर उपस्थित होते.
माझ्या आश्रमात लावलेल्या चंदन झाडांची चार वर्षांपूर्वी तस्करांनी चोरी केली होती. त्या घटनेचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामध्ये हत्यारासह दिसलेल्या चोरांची ओळख परिसरातीलच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपास न लागल्याने पुन्हा ही चोरी झाली असल्याची खंत वाटली.
-१००८ स्वामी विष्णूदास महाराज