रेशनचा गहू काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यास रयत सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:43+5:302021-08-01T04:15:43+5:30
महिला दुकानदारासह दिरावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी पकडून देणाऱ्या रयत सेनेच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र ...

रेशनचा गहू काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यास रयत सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहाथ
महिला दुकानदारासह दिरावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी पकडून देणाऱ्या रयत सेनेच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील महिला दुकानदाराच्या नावे तमगव्हाण येथे १६७ नंबर रेशन दुकान आहे. रेशन दुकानदाराचे दीर रवींद्र निंबा पाटील हे ३० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता (एमएच १५बीएक्स २२८२) या व्हॅनमध्ये सहा क्विंटल रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी आडमार्गाने माळशेवगे मार्गे अंधारी रस्त्यावरून जात असताना रयत सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅन थांबवून रेशन दुकानदाराला विचारपूस करून गाडीत असलेला गहू रेशनचा आहे, मग तुम्ही हा गहू कुठे घेऊन चालला? असे विचारताच त्याची भंबेरी उडाली. त्याने तमगव्हाण गावातील राजकीय लोकांना सांगून रयत सेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला. मात्र कार्यकर्त्यांनी त्या दबावाला न झुगारता गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई व्हावी, म्हणून तहसीलदार अमोल मोरे यांना थेट भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी पुरवठा निरीक्षकांना घटनास्थळी पाठवून व्हॅन ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनला नेली व पुरवठा निरीक्षक मंजुक्षा देवरे यांच्या फिर्यादीवरून तमगव्हाण येथील महिला दुकानदार व त्यांचे दीर रवींद्र निंबा पाटील यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत. तमगव्हाण येथील रयत सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळ्याबाजारात जाणारा गहू पकडून दिल्याने रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ यांच्यासह पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
310721\31jal_3_31072021_12.jpg
चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथून काळ्या बाजारात जाणारा हाच तो वाहन.