छोट्या-मोठ्या वाहनांना रात्रीचा प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या कामात धुळे- जळगावदरम्यान एखादा टप्पा पूर्ण झाला की तो रहदारीस मोकळा करण्यात येतो, परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नवा रस्तादेखील काही दिवसांनी जुन्या रस्त्यापेक्षा खराब होत आहे. तसेच कामदेखील अत्यंत संथ गतीने सुरू आहे. निकृष्ट कामामुळे नवीन बनवलेल्या रस्त्यालादेखील खोलवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
काही ठिकाणी काम सुरू असल्याचे कुठे फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह दिसून येत नाही. त्यामुळे रात्री अनेक ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होत आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाचे खोदकाम प्रमाणात खदानीत न करता मक्तेदार सोयीच्या कुठल्याही जागी खोदकाम करीत असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडून पावसाचे पाणी साचून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे जीवितहानी अथवा पशुधनाची जीवितहानी होत असते.
रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, नागरिकांचा जिवाचा खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून यावर त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे. आपण संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून योग्य आदेश निर्गमित करून सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.