लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:47+5:302021-08-01T04:16:47+5:30
जळगाव : सत्तावीस वर्षीय घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी राजेश भीमराव साळुंखे (रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध ...

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार
जळगाव : सत्तावीस वर्षीय घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी राजेश भीमराव साळुंखे (रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेचा २००७ मध्ये मालेगाव येथील तरुणाशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर पीडितेच्या माहेरातील घराशेजारी राहणाऱ्या राजेश साळुंखे यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब पतीला माहिती झाल्यानंतर सन २०१७ मध्ये त्यांनी पीडितेला रीतीरिवाजाप्रमाणे घटस्फोट दिला. नंतर ही महिला जळगावात आईकडे राहू लागली. जानेवारी २०१८ मध्ये राजेश व पीडित महिलेने एका मंदिरात लग्न केले. नंतर दोघे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहू लागले. त्यानंतर वर्षभराने महिलेने एका मुलीला जन्म दिला. मुलीचा सांभाळ करण्यासाठी ती आईकडे राहू लागली. सोबत का राहत नाही, यावरून दोघांमध्ये नेहमी शाब्दिक वाद होऊ लागले. अखेर दोघे पुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या घरात राहायला लागले.
हॉटेलात नेऊन अत्याचार
मार्च २०२१ मध्ये राजेश याचे आई-वडील हे त्याच्या घरी आले व त्याला तेथून घेऊन गेले. २५ जुलैला एरंडोल येथे नातेवाइकाचे लग्न असल्यामुळे पीडिताही तेथे आली होती. तिने राजेशशी संपर्क साधल्यानंतर तो तेथे आला. नंतर त्याने उद्याच रीतीरिवाजानुसार लग्न करू, असे सांगून बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. नंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. शेवटी पीडितेला एरंडोल येथील बसस्थानकाजवळ सोडून दिले. अखेर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच, महिलेने शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पीडितेच्या फिर्यादीवरून राजेश साळुंखे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.