जळगाव : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह अन्य पुरोगामी मंडळींच्या झालेल्या हत्यांशी संबंध जोडून काही मंडळी तसेच काही राजकीय पक्ष सनातन संस्थेला नामशेष करू पहात असल्याचा आरोप करीत त्या विरोधात शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.अध्यात्म आणि हिंदुत्व प्रसारात अग्रणी असल्यामुळेच हिंदुविरोधी शक्ती सनातन संस्थेचे कार्य दडपू पहात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थेवरील बंदी आणण्याचा प्रयत्न करून हिंदुत्वाची गळचेपी करण्याचे हे षड्यंत्र रोखण्यासाठी या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. जि.प. नजीकच्या पत्री हनुमान मंदिरापासून मोर्चास सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप झाला. या वेळी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
‘सनातन’वरील संभाव्य बंदी विरोधात जळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:52 IST