रेल्वे फुल्ल; मुंबईसाठी आरक्षण मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:50+5:302021-09-11T04:18:50+5:30
स्थानिक प्रवाशांची गैरसोय : दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी माञ कमी स्टार ११६३ जळगाव : अनलॉक नंतर रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर ...

रेल्वे फुल्ल; मुंबईसाठी आरक्षण मिळेना !
स्थानिक प्रवाशांची गैरसोय : दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी माञ कमी
स्टार ११६३
जळगाव : अनलॉक नंतर रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर वगळता सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना गर्दीने हाऊसफुल्ल धावत आहेत. यामुळे स्थानिक प्रवाशांना आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. एकीकडे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असतांना, दुसरीकडे मुंबईकडून दिल्ली, पश्चिम बंगाल या भागात जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची संख्या कमी आहे. मात्र, दिवाळीपर्यंत मुंबईसह पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना अशीच परिस्थिती राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
इन्फो :
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना
- अनलॉक नंतर रेल्वे प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने सर्व मार्गा वरच्या गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, यात परप्रांतातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल येत आहेत. यामुळे स्थानिक प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे अवघड झाले आहे.
- रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये अमृतसर एक्स्प्रेसला सध्या नो रूम आहे. म्हणजे या गाडीचे वेटींगचे तिकीट सुद्धा प्रवाशांना मिळणार नाही.
- तसेच मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेस ९८ वेटींग, गीतांजली एक्स्प्रेस १११ वेटींग, काशी एक्स्प्रेस ९८ वेटींग, हावड़ा मेल ४५ वेटिंग आहे. तसेच जळगावहुन पुण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला ५५ वेटींग असून आझाद हिंद एक्सप्रेसला ६५ वेटींग आहे.
इन्फो :
दिल्ली, पश्चिम बंगाल मार्गावर गर्दी कमीच
एकीकडे मुंबई व पुणे मार्गावर रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असतांना, दुसरीकडे मुंबईहुन दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची संख्या कमी आहे. तसेच या मार्गावर जळगावहुन दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या कमी असून, या गाड्यांचे आरक्षण तिकीट लवकर आरक्षण होत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
हावडा एक्सप्रेस
गीतांजली एक्स्प्रेस
कामायनी एक्स्प्रेस
सेवाग्राम एक्स्प्रेस
महाराष्ट्र एक्स्प्रेस
काशी एक्स्प्रेस
इन्फो :
ना मास्क, ना सोशल डिस्टनिंग
- अनलॉक नंतर रेल्वे प्रशासनाने सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांची एकच गर्दी वाढल्याने या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे.
- या एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये प्रचंड गर्दी असून, सोशल डिस्टनिंगचा पुर्णतः फज्जा उडत आहे.
- विशेष म्हणजे अनेक प्रवासी विना मास्क प्रवास करीत असतांनाही, रेल्वे प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे.
- गर्दीमुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे, या गाड्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा डबे जोडण्याची मागणी होत आहे.