शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम न दिल्याने बेलगंगा कारखान्याची मालमत्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 21:05 IST2020-12-16T21:05:32+5:302020-12-16T21:05:47+5:30
साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऊस (नियंत्रण )आदेश १९६६ चे कलम ३(८) नुसार आदेश पारीत केलेले आहेत.

शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम न दिल्याने बेलगंगा कारखान्याची मालमत्ता जप्त
जळगाव : बेलगंगा साखर कारखान्यातील २०१८-१९ या गळीत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची प्रमाणित केलेली उसाची रक्कम ( एफआरपीची रक्कम) ३८६.०६ लाख व त्यावरील १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यास कसूर केल्याच्या कारणावरून बेलगंगा साखर कारखाना (अंबाजी शुगर्स लि.) ची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारखान्याच्या मालमत्तेच्या ७/१२ उताऱ्यावरून अंबाजी शुगर्सचे नाव काढून त्याठिकाणी मालक म्हणून महाराष्ट्र सरकारचे नाव लावण्यात आले आहे.
साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऊस (नियंत्रण )आदेश १९६६ चे कलम ३(८) नुसार आदेश पारीत केलेले आहेत. बेलगंगा साखर कारखान्याची म्हणजे अंबाजी शुगर्स लि. यांची भोरस बुद्रुक व डोणदिगर या गावाच्या शिवारातील सर्व प्रॉपर्टी जप्तीचा आदेश तहसीलदार
अमोल मोरे यांनी काढले. पुढील आदेश होईपर्यंत या मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. कारखाना दोन वर्षापासून बंद असल्याने त्याची माहिती साखर आयुक्त विभागाला दिली गेली नाही. त्यांची नोटीस ही प्रत्यक्षात मिळालेली नाही. त्यामुळे झालेली कारवाई चुकीची असून ही बाब त्यांच्या
निरदर्शनास आणून देणार आहोत. वसुलीसाठी त्यांना अधिकार असला तरी त्यासाठी प्रॉपर्टी मालकी हक्क लावणे योग्य नाही.
-चित्रसेन पाटील,चेअरमन बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव
वसुली संदर्भातील ही शासकीय कारवाई आहे. साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी जळगाव यांचे याबाबतचे आदेश होते.त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- अमोल मोरे, तहसीलदार, चाळीसगाव.